कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा अखेर विस्तार, २४ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

बंगळूर, २७ मे २०२३: कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. बंगळूरातील राजभवन येथे २४ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. एच.ए.पाटील, कृष्णा बायरेगौडा, एन चालुवर्यस्वामी, के व्यंकटेश, महादेवप्पा ईश्वर खांद्रे, कायथसंद्र राजन्न, दिनेश गुंडू राव, शरणबसप्पा दर्शनापूर, शिवानंद पाटील, तिम्मापूर रामाप्पा बाळाप्पा, आणि इतरांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

राज्यपाल धावरचंद गेहलोत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. कर्नाटक काँग्रेसचे नेते रुद्रप्पा लमाणी यांच्या समर्थकांनी कर्नाटक प्रदेश कॉग्रेस कमिटी कार्यालयाबाहेर लमाणी यांना मंत्रिपद देण्याची मागणी करत निदर्शने केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार गेले दोन दिवस दिल्लीत होते. सिद्धरामय्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर २४ जणांची यादी निश्चित केली होती.

पुढच्या वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्या निवडणुकीची तयारी करावी, त्यासाठी त्यांनी पक्ष संघटना वाढवण्याकडे लक्ष द्यावे, असे सुचवण्यात आले आहे. लोकसभा निवडणूकीत कर्नाटकातून २८ पैकी २० खासदार निवडून आणण्याचे लक्ष्य काँग्रेसने ठेवले आहे. ते गाठण्यासाठी पक्षाची जबाबदारी जेष्ठ नेत्यांकडे देण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा