मणिपूर हिंसेमागील सत्य काँग्रेस दडपत आहे, राहुल गांधी यांनी मणिपूरमध्ये आग लावली, राज्यसभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली, २७ जुलै २०२३ : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मणिपूर प्रकरणात काँग्रेस सदस्याच्या प्रश्नावर प्रचंड संताप व्यक्त करीत काँग्रेस मणिपूर हिंसे मागील सत्य दडपत असल्याचा आरोप केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरमध्ये आग लावल्याचा हल्लाबोल स्मृती इराणी यांनी केला. संसदेत प्रश्नोत्तराच्या तासांत त्यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दात पलटवार केले.

काँग्रेसचे राज्यसभा सदस्य अमी याग्निक यांनी महिला मंत्री मणिपूर घटनेवर का बोलत नाहीत असा आरोप केल्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यावर अत्यंत आक्रमक शब्दात प्रत्युत्तर दिले.अमी याग्निक यांनी प्रश्नोत्तराच्या तासांत राज्यसभेत पूरक प्रश्न विचारताना महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील महिला सहकारी मणिपूर मु्द्द्यावर गप्प का? यावर स्मृती इराणी आक्रमक झाल्या. त्यांनी म्हटले की यावर माझा तीव्र आक्षेप आहे. केवळ महिला मंत्री नव्हे तर महिला राजकीय नेत्यांनी मणिपूर सोबतच छत्तीसगड, राजस्थान तसेच बिहारमध्ये होणाऱ्या घटनांवरही लक्ष केंद्रीत करायला हवे. या राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवर ते बोलण्याचे धाडस दाखवू शकतात काय ? असा सवाल त्यांनी केला.

तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही छत्तीसगड बद्दल बोलाल, राजस्थान, बिहारमधील घटनांवर बोलाल, तुमच्यात लाल डायरीबद्दल बोलण्याचे धाडस आहे का ? त्यांच्यात हे बोलण्याचे धाडस आहे? की एक काँग्रेसचा नेता तेथे गेल्यानंतर मणिपूर जळू लागले. हे बोलण्याचे धाडस आहे? की राहुल गांधी मणिपूरला गेल्यानंतरच तेथे हिंसा वाढू लागली असा जोरदार प्रहार विरोधकांवर करत स्मृती इराणी यांनी यावेळी संसद दणाणून सोडली.

काँग्रेस शासित राज्यातील महिला बलात्कारावर बोलण्याचे धाडस तुमच्यात आहे का? जर ते या घटनांवर बोलू शकत नाहीत तर त्यांनी महिला मंत्र्यांवर अनावश्यक दबाव टाकू नये असेही इराणी म्हणाल्या. लोकसभेत केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी मणिपूर प्रकरणावर सरकार विरोधकांच्या सर्व प्रश्नांवर बोलण्यास तयार असल्याचे पत्र दोन्ही सभागृहांच्या विरोधी पक्षनेत्यांना लिहीले आहे. या प्रकरणी सौहार्दात्मक चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा