पक्षाध्यक्षांच्या उपस्थितीत काँग्रेस नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक

नवी दिल्ली, १० जुलै २०२३ : राज्याच्या राकारणात काय होईल याचा काही अंदाज राहिला नाही. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट झाली. आत्ताच्या राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तसेच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उद्या दिल्लीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे.

विशेष म्हणजे मल्लिकार्जुन खरगे राज्या-राज्यांतील प्रदेश काँग्रेस नेत्यांच्या बैठका घेत आगामी निवडणूक बाबत रणनीती ठरवत आहे. ११ जुलै रोजी महाराष्ट्रासंदर्भातील महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, माणिकराव ठाकरे अशा सुमारे १५ वरिष्ठ नेत्यांना दिल्लीला येण्यास सांगण्यात आले आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला दिले जावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. यासंदर्भात प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थित चर्चाही झाली असून त्यावर मंगळवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर काँग्रेसकडून अधिकृतपणे विरोधीपक्ष नेतेपदाची मागणी केली जाऊ शकते.

भाजप च्या नेत्यांकडून काँग्रेस फुटी बाबत भाष्य होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनंतर काँग्रेसमध्येही फूट पडण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस एकसंध ठेवण्यासंदर्भात महत्त्वाची पावले उचलली जाणार आहेत. वर्षभराच्या कालावधीत शिवसेना व आता राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडल्याने त्याची काँग्रेसमध्ये पुनरावृत्ती होऊ नये, याची दक्षता काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व घेत आहे. राज्यात महाविकास आघाडी कायम राहणार असल्याने काँग्रेसला अधिक मोठी संधी मिळू शकते. तसेच सभागृहात आत्ता काँग्रेसला विरोधी पक्ष नेता पदही मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस हा सर्वाधिक स्थिर पक्ष असून भाजपविरोधात अधिक आक्रमक धोरण काँग्रेसकडुन बांधले जाऊ शकते. त्या दृष्टीनेही बैठकीत चर्चा होईल.

न्युज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा