काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर काँग्रेस नेते नाराज, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे तक्रार

नागपूर, २६, मे २०२३ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत हाय कमांडकडे धाव घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष पदावरून काँग्रेस नेत्यांनी नाना पटोले यांना बदलण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे केली. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदल व्हावा म्हणून विजय वडेट्टीवार, सुनील केदार, संजय निरूपम आणि शिवाजीराव मोघे यांनी दिल्लीत धाव घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बदलण्याची मागणी केली.

याविषयी माजी मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. या बद्दल अभिनंदन करण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना सुद्धा भेटायला गेलो मात्र त्यांची भेट झाली नाही, कारण ते दिल्लीत नव्हते. देशात काँग्रेसमय वातावरण होते. निवडणुकीमागे ज्यांचे नेतृत्व होते त्यांचे अभिनंदन करणे हा उद्देश होता असे वडेट्टीवार म्हणाले.

राज्यात बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाले. प्रत्येक नेत्यांनी आप आपल्या जिल्ह्यामध्ये चांगले काम केले. जो काम करतो त्याला न्याय मिळाला पाहिजे. पक्षांतर्गत केलेल्या कारवाईवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, की कोणी चुकीचे काम केले असेल तर कारवाई करायला पाहिजे. पण कारवाई करत असताना सगळ्यांना विचारात घेऊन कारवाई केली पाहिजे होती असेही विजय वडेट्टीवर म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा