इंधन दरवाढीविरोधात नागपुरात काँग्रेसची भर पावसात रॅली

नागपूर, ९ जुलै २०२१: सध्या देशात महागाईचा भडका चांगलाच उडाला आहे. यात महत्त्वाचा घटक म्हणजे इंधन दरवाढ. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून इंधनामध्ये सातत्यानं दरवाढ होताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे २०१४च्या प्रचारादरम्यान भाजपने दरवाढी वरूनच मागील सरकारला घेरलं होतं. आता असंच काहीसं घडताना दिसत आहे. पण, यावेळी भाजप सत्तेत आहे आणि काँग्रेसकडून वाढलेल्या प्रचंड महागाई विरोधात आंदोलन होताना दिसत आहे. इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात काँग्रेसने काल राज्यातील सर्व महसुली आयुक्त मुख्यालयाच्या ठिकाणी सायकल रॅली काढून मोदी सरकारचा निषेध केला. नागपुरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात सायकल यात्रा काढण्यात आली.

वाढलेल्या इंधनाच्या प्रचंड दरामुळं वाहनांचा वापर करावा तरी कसा या मुद्द्यावर सायकल चालवून केंद्र सरकार विरोधात निदर्शनं करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, आ. अभिजित वंजारी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

केंद्रातील मोदी सरकारनं कृत्रिम महागाई निर्माण करून सामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या कमकुवत केलंय. या सामान्य माणसाच्या वेदना दिल्लीच्या सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी तसेच सामान्य जनतेच्या हक्कासाठी ऊन पावसाची तमा न बाळगता काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस व जिवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढवल्याने सर्व प्रकारची महागाई वाढली असून लोकांचे जगणं मुश्कील झालंय. सरकारचे अपयश झाकण्यासाठी मंत्रीमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे’, अशी घणाघाती टीका यावेळी नाना पटोले यांनी केलीय.

आपल्याच लोकांना १०० रुपयांना का?

पटोले पुढे म्हणाले की, ‘केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे जुलमी, अत्याचारी सरकारमुळं जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. शेजारच्या देशात भारत ३० रुपयांनी पेट्रोल व २२ रुपयांनी डिझेल देते आणि आपल्याच लोकांना १०० रुपयांना का? हे अन्यायी मोदी सरकार उखडून फेकण्यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून सामान्य जनतेसाठी संघर्ष करत आहे’.

नवी मुंबई, पुणे, औरंगाबादेतही काँग्रेसचं आंदोलन

दुसरीकडे नवी मुंबई, पुणे, औरंगाबादेतही काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आलं. महागाई विरोधातील काँग्रेसच्या १० दिवसांच्या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात शुक्रवारी प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यातील आंदोलनात आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही सहभागी होणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा