कर्नाटक, १३ मे २०२३: कर्नाटकात काँग्रेसने निर्णायक आघाडी घेतली आहे. यामुळे भाजपला धक्का देत काँग्रेसने स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. दुपारी १२ वाजता निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने १२४ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप ७०, जेडीएस २३ जागांवर आणि अपक्षांनी ५ जागांवर आघाडी घेतली आहे. कर्नाटकात बहुमताचा आकडा ११३ आहे.
काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. काँग्रेस स्वबळावर सरकार स्थापन करेल असा विश्वास काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला आहे. सिद्धरामय्या हे वरुणा मतदारसंघात भाजपचे मंत्री व्ही सोमन्ना यांच्या विरोधात बहुमत मतांने विजयी झाले आहेत. तसेच काँग्रेसने पक्षाच्या सर्व आमदारांना बंगळूरला बोलावले असून पक्षाने बंगळूर आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स बुक केले आहेत.
निवडणूकपूर्व चाचण्या आणि एक्झिट पोलमध्ये कॉग्रेस हा १०० ते ११० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरेल, असं भाकित वर्तवण्यात आले होते. तर काही एक्झिट पोलनी काँग्रेसला स्पष्ट बहुमत देऊ केले होते. राज्यातील २२४ विधानसभा मतदारसंघात २.६१५ उमेदवार रिंगणात आहेत. बेळगांव जिल्ह्यातील १८ मतदारसंघात १८७ उमेदवार लढले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर