संरक्षणविषयक संसदीय समितीच्या बैठकीतून काँग्रेसचं वाॅकआउट

नवी दिल्ली, १७ डिसेंबर २०२०: कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाचे अन्य सदस्य संरक्षणविषयक बाबींबाबत संसदीय समितीच्या बैठकीदरम्यान बाहेर पडले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांनी असा आरोप केला की, संसदीय समितीनं सशस्त्र दलाच्या गणवेशावर चर्चा करून वेळ खराब केला आहे, तर सैन्याला अधिक सुसज्ज कसे करावे यावर चर्चा व्हायला हवी होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण प्रमुख बिपिन रावत समितीला संरक्षण गणवेशाविषयी माहिती देताना राहुल गांधी यांनी हस्तक्षेप करून लडाखमध्ये देशाची काय तयारी आहे? चीनविरूद्ध आपली रणनीती काय असावी? याबाबत चर्चा करण्यास सांगितलं.

राहुल म्हणाले की, सैन्याच्या गणवेशावर चर्चा करण्याऐवजी देशातील राजकीय नेत्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करायला हवी. समितीचे अध्यक्ष असलेले जुअल ओराम यांनी राहुल गांधी यांना बोलण्यापासून रोखलं. त्यानंतर राहुल गांधी बैठकीतून बाहेर पडले आणि त्यांच्यासमवेत राजीव संचा आणि रेवंत रेड्डी हे ही बैठकीतून बाहेर पडले.

यापूर्वी राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली होती. याआधी देखील राहुल गांधी सतत चीनबरोबरच्या लडाख सीमेवरील वादावरून टीका करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्रमक पद्धतीने हल्ला करत आहेत.

राहुल गांधींच्या वतीनं असा दावा केला जात आहे की चीननं भारतीय सीमेत घुसून बरीच जागा ताब्यात घेतली आहे. पण, पंतप्रधान मोदींना चीनची भीती आहे, त्यामुळं ते काहीही करण्यास असमर्थ आहेत. लडाख सीमेवर एप्रिलमध्ये सुरू झालेल्या वादाच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी सोशल मीडिया, पत्रकार परिषदेतून मोदी सरकारला अनेकदा घेराव घातला. याशिवाय नेपाळ आणि बांगलादेशशी असलेल्या संबंधांवरही कॉंग्रेसनं सरकारवर निशाणा साधला आहे.

एलपीजी किंमत वाढीवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न

बुधवारी राहुल गांधींनी स्वयंपाक गॅसच्या किंमती वाढविण्याबाबतही मोदी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरवर #LPGPriceHike असं हॅश टॅग करत “देशातील अन्नदात्यावरही वार त्याच बरोबर आता अन्नपूर्णा वर देखील वार, देशाला आणखीन किती करणार लाचार” असं लिहिलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा