भिवंडी, ९ सप्टेंबर २०२०: शहापूर तालुक्यातील कोविड रूग्णांना आता भिवंडी शहरातील कोविड सेंटर व रुग्णालयात उपचार दिले जाणार आहेत. शहापूर तालुक्यातील कोविड सेंटरची रुग्ण क्षमता संपुष्टात आल्यामुळे कोरोना रूग्णांवर आता उपचार कसे होणार हा प्रश्न नागरिकांसमोर उभा होता . मात्र या निर्णयामुळे सध्या काही प्रमाणात शहापूरकरांना दिलासा मिळाला आहे .
भाजपाचे खासदार कपिल पाटील यांना हा प्रकार समजताच त्यांनी तातडीने यात लक्ष घालून हे प्रकरण महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्या कानावर घातलं होतं. त्यामुळे वेळीच यावर निर्णय घेतला गेला. तालुक्यातील रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे कोविड सेंटर पूर्णपणे रुग्णांनी भरले आहे. या सेंटरमध्ये नव्या रुग्णांना दाखल केले जात नाही. तर भिवंडीमधील रुग्णालये व कोविड सेंटर हे रिकामे आहेत. त्यामुळे शहापूरातील कोरोना रूग्णांना आयुक्त आशिया यांनी मंजुरी दिली आहे.
शहापूरातील रुग्णांसाठी भिवंडीत १०० हून अधिक बेड उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. तरुलता धानके यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन खासदार कपिल पाटील यांनी केले आहे. त्यामुळे खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाला यश आल्याने सध्या शहापूरकर सुखावले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे