राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, २२ जानेवारी २०२३ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता. २१) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले. श्री. पवार हे मोठे नेते असून, त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे ते म्हणाले. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत शरद पवारही व्यासपीठावर उपस्थित होते. शरद पवार ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष आहेत. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की शरद पवार हे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनुभवी नेते आहेत. त्यांचे सहकार क्षेत्रातील योगदान मोठे असून, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही; तसेच जनतेच्या आणि राज्याच्या हितासाठी सत्तेत कोणीही असो; श्री. शरद पवार मार्गदर्शन आणि सूचनांसाठी सदैव उपलब्ध असतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार क्षेत्राने संकटकाळातही नफा-तोट्याचा विचार न करता सामाजिक जबाबदारीचे पालन केल्याबद्दल कौतुक केले. सहकार क्षेत्राच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले; तसेच येत्या काही वर्षांत एकूण अडीच लाख हेक्टर लागवडीयोग्य जमीन बागायती जमिनीत रूपांतरित केली जाईल, असेही सांगितले. यावेळी ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, की साखर कारखाने बळकट करून त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी साखरेव्यतिरिक्त इतर उत्पादनांच्या उत्पादनावर भर देणे ही काळाची गरज असून, इथेनॉल निर्मितीसाठी जादा साखरेचा वापर करावा, असेही ते म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की मागच्या आठवड्यात मकर संक्रांत झाली असून, सर्वांनी गोड गोड बोलायचे आहे. मी नुकताच दावोस येथे जाऊन आलो. शरद पवार अनुभवी आहेत. शरद पवारांना माहिती आहे गुंतवणूक कशाप्रकारे महत्त्वाची आहे. त्यांचे सहकार क्षेत्रातील योगदान नाकारता येणार नाही. त्यामुळे कोणी काही बोलो; परंतु राज्यासाठी मोठी गुंतवणूक आलेली आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे राज्यात उद्योग उभारण्यास इच्छुक असलेल्या गुंतवणूकदारांना चांगल्या पायाभूत सुविधा आणि सबसिडी देण्यात येईल. येथील परिस्थिती गुंतवणूकदारांसाठी अनुकूल आहे. कारण गुंतवणुकीला भरपूर वाव आहे. आपल्या कामातून टीका करणाऱ्यांना उत्तर देणार असल्याचे शिंदे म्हणाले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा