नवी दिल्ली, 6 जून 2022: प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे वक्तव्य आलंय. त्यांनी आपल्या टिप्पणीबद्दल माफी मागितली आहे. मी माझे शब्द मागे घेते असंही सांगितलं. कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, माझ्या बोलण्याने कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेते, असे त्या म्हणाल्या.
नुपूर शर्मा म्हणाल्या की, दररोज माझ्या आराध्य शिवाचा अपमान केला जात होता. शिवरायांचा अपमान मला सहन होत नव्हता. मी रागात काही गोष्टी बोलले.
त्याचवेळी, कारवाईनंतर लगेचच नुपूर शर्मा यांनी आवाहन केले आणि सांगितले की, त्यांच्या घराचा पत्ता सार्वजनिक करू नका. यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेला धोका आहे.
नुपूर शर्मा यांच्यावरील कारवाईपूर्वी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात पक्षाने म्हटले होते की, भारतीय जनता पक्ष कोणत्याही धर्माच्या किंवा पंथाच्या भावना दुखावणारी अशी कोणतीही कल्पना स्वीकारत नाही. या गोष्टींसाठी भाजप असा कोणताही विचार स्वीकारत नाही किंवा प्रोत्साहनही देत नाही.
या कारवाईनंतर नुपूर शर्माने केले ट्विट
पक्षातून निलंबनाच्या कारवाईनंतर नुपूर शर्माने ट्विट केले की, ‘गेल्या अनेक दिवसांपासून मी टीव्हीवर वादविवाद करत होते, जिथं माझ्या आराध्य शिवजींचा दररोज अपमान केला जात होता. ते शिवलिंग नसून कारंजे आहे असे माझ्यासमोर बोललं जात होतं. दिल्लीच्या प्रत्येक फूटपाथवर अनेक शिवलिंगे दिसतात, जाऊन त्याची पूजा करा. आमच्या महादेव शिवाचा अशा प्रकारे पुन्हा पुन्हा माझ्यासमोर होणारा अपमान मला सहन होत नव्हता. मी रागात काही गोष्टी बोलले. माझ्या बोलण्याने कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द परत घेते. कोणालाही दुखवण्याचा माझा हेतू कधीच नव्हता.
कारवाईपूर्वी भाजप काय म्हणाले?
नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी भाजपने सांगितलं की, भारतीय जनता पक्ष कोणत्याही धर्माच्या किंवा पंथाच्या भावना दुखावणारी अशी कोणतीही कल्पना स्वीकारत नाही. भाजप असा कोणताही विचार स्वीकारत नाही किंवा प्रोत्साहनही देत नाही. त्यात भाजपने म्हटलंय की, देशाच्या संविधानानेही भारतातील प्रत्येक नागरिकाने सर्व धर्मांचा आदर करावा अशी अपेक्षा केली आहे.
हा होता वाद
एका टीव्ही वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान, भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केली, ज्यामुळं अल्पसंख्याक समुदायातील लोक संतप्त झाले. या कमेंटनंतर नुपूर शर्माने सांगितलं की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे, जो एका फॅक्ट चेकने शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यापासून त्यांना इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून धमक्या येत आहेत. नुपूर शर्माने आरोप केला होता की Alt न्यूजच्या मालकाने तिच्याविरुद्ध ट्रोल्सचा प्रचार करण्यासाठी संपादित व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यांनी सुरक्षा मागितली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे