पुणे, ४ एप्रिल २०२१: पुण्यात कोरोना चा उद्रेक पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. दरम्यान परवा ७ दिवसांसाठी पुण्यामध्ये अंशतः लॉक डाऊन देखील लावण्यात आले. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये पुणे महानगरपालिकेने कोणतेही कंटेनमेंट झोन किंवा मायक्रो कंटेनमेंट झोन जाहीर केले नव्हते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने वाढत असलेला कोरोना चा प्रादुर्भाव पाहता पुणे महानगरपालिकेने पुन्हा मायक्रो कंटेनमेंट झोन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता हा अधिकार महानगरपालिकेने प्रत्येक प्रभागीय कार्यालयांना (वॉर्ड ऑफिस) दिला आहे. यानुसार इमारती, सोसायट्या तसेच ठराविक भाग लक्ष करून असे मायक्रो कंटेनमेंट झोन तयार करण्याचे आदेश महानगरपालिकेने दिले आहेत. महानगरपालिकेच्या आदेशानुसार जर एखाद्या इमारतीमध्ये ५ किंवा त्यापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले तर अशी इमारत मायक्रो कंटेनमेंट झोन मानली जाईल. तसेच कोणतीही सोसायटी किंवा रहिवासी भाग जिथे २० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत अशी सोसायटी किंवा रहिवाशी भाग मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून मानला जाईल.
प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य पाहता रुग्णालयात जागा शिल्लक रहाव्यात म्हणून कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली आहे. अशा रुग्णांच्या हातावर महानगरपालिकेने पुन्हा शिक्के मारण्यास सुरुवात केली आहे. सध्या स्थितीला १ एप्रिल च्या आकडेवारीनुसार पुणे महानगरपालिकेत २६८ मायक्रो कंटेनमेंट झोन आहेत. १ एप्रिल रोजी, एकूण ११७ गृहनिर्माण संस्था, ११५ इमारती आणि ३६ परिसर मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले.
औंध-बाणेर वॉर्ड (५६) मध्ये ४२ गृहनिर्माण संस्था आणि १४ इमारतींचा समावेश असलेल्या कंटमेंट झोनची सर्वाधिक संख्या आहे. नगर रोड-वडगाव शेरी वॉर्ड आणि हडपसर-मुंढवा प्रभागात प्रत्येकी ४० आहेत. नगर रोड-वडगाव शेरीमध्ये २३ गृहनिर्माण संस्था, १२ इमारती आणि ५ परिसर मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत, तर हडपसर मुंढवामध्ये ३० इमारती, सात गृहनिर्माण संस्था आणि तीन परिसर मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे