दौंड, दि. ९ मे २०२०: दौंड रेल्वे जंक्शन व पुणे सोलापुर महामार्गाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याच्या अत्यंत जवळ संपर्क असणाऱ्या दौंड तालुक्यात प्रशासन व पोलीसांच्या शिस्तबद्ध पद्धतीत चाललेल्या नियोजनामुळे कोरोनाला रोखण्यात यश मिळवले होते. मात्र शेवटच्या टप्प्यात दहिटने येथील एका इसमाला कोरोनाची लागण झाली तसेच मुंबई येथुन बंदोबस्त करून माघारी परतलेल्या राज्य राखीव दलाच्या नऊ जवानांना कोरोनाची लागण झाली होती तदनंतर पुन्हा आलेल्या तुकडीत देखील पंधरा जवान कोरोना बाधीत झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या पार्श्वभूमीवर दौंड ला चौदा दिवस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. यामध्ये थोड्याफार प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. शहराच्या परिसरात काही प्रमाणात बाजारपेठ नागरिकांना खुल्या करून देण्यात आल्याने तुरळक प्रमाणात ग्राहकांची वर्दळ दिसून येत आहे तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी स्थानीक प्रशासनाने नियोजनबद्ध लॉक डाऊन अंमलात आणला असल्याचे चित्र आहे.
दरम्यान राज्य राखीव दलाच्या मुंबईहुन बंदोबस्त पूर्ण करून आलेल्या जवानांना दलाच्या अंतर्गत व नानविज येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात विलगिकरण करण्यात आले होते. राज्य राखीव बलाच्या तुकडीला योग्य नियोजनाच्या आधारे विलगिकरण केल्याने सध्यातरी कोरोनाची लक्षणे फक्त बंदोबस्त करुन आलेल्या जवानांनाच झालेला आहे. त्यामुळे दाट लोकवस्ती असणाऱ्या दौंड शहराला संसर्ग होण्यापासून सुरक्षीत ठेवण्यास प्रशासनाला यश आले आहे.
दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या चाचण्या करण्याची व्यवस्था करण्यात आल्याने देखील ग्रामीण भागातील रुग्णांना याचा उपयोग होणार आहे. तालुक्यात आमदार राहुल कुल यांनी कोरोनाच्या धर्तीवर सर्व प्रशासनाला योग्य मार्गदर्शन व वेळोवेळी योग्य सूचना करून दौंड तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होऊन देखील त्याचा प्रसार होऊ दिलेला नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: रिजवान शेख