सासवड येथे एंन्टिजन किटच्या साह्याने कोरोना तपासणी सुरु

पुरंदर, २५ ऑगस्ट २०२० : पुरंदर तालुक्यात सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात आज पासून एंन्टिजन किट मार्फत कोरोना स्वॅब तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील कोरोना संशयितांचे स्वॅब आता तालुक्यातच एंन्टिजन किट वापरून तपासण्यात येतील. तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुरंदर तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या टेस्ट सुद्धा मोठ्या प्रमाणात कराव्या लागत आहेत. या सर्व टेस्टचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात येत होते. मात्र यामुळे संबंधितांचे निकाल यायला एक किंवा दोन दिवस लागत होते. त्यामुळे उपचारास वेळ लागत होता. विलंब टाळावा म्हणून आता पुरंदर तालुक्यातील सासवड येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोरोनाची तपासणी करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.यामुळे आता तालुक्यात कोरोनाचे त्वरित निदान होणार आहे.

तालुक्यातील सासवड ग्रामीण रुग्णालयाने आज एकूण ५१ स्वॅबची एंन्टिजन किट वापरून तपासणी केली. त्यापैकी १३ जन पॉझिटीव्ह आले आहेत. सासवड येथील ८, खळद येथील २, दिवे येथील ३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आता कोरोना रूग्णांना काही तासांतच कोरोनाबाबतचा अहवाल मिळणार आहे. लवकरच जेजुरी येथेही सदर तपासणीस सुरुवात होणार असल्याची अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा