पुरंदर, दि. २० जुलै २०२०: पुरंदरच्या तहसील कचेरीत आता कोरोनाने थेट शिरकाव केला आहे. पुणे शहरातील निवासी असलेला एक कर्मचारी मागील दोन दिवसांपासून आजारी होता. त्याचा मृत्यू आज सोमवारी झाला. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता तहसील कचेरीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खुद्द तहसील कचेरीतीलच कर्मचारी कोरोनाने मृत झाल्याने आता प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
तहसील कार्यालय पुरंदर येथील एक कर्मचारी गणेश कुचेकर हे कालपासून दवाखान्यात उपचारासाठी दाखल होते. ते आज मयत झालेत. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. असे त्यांच्या घरच्यांनी पुरंदर प्रशासनाला कळविले आहे. सदर कर्मचारी पुणे येथे राहणारे होते. त्यांच्या जाण्याने महसूल विभागाने एक प्रामाणिक, मन लावून चांगले काम करणारा कर्मचारी गमावला आहे. पुरंदर तहसीलचेही त्यांच्या जाण्याने मोठे नुकसान झाले आहे.अशी भावना पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी व्यक्त केली आहे
अत्यावशक असेल तरच तहसील कार्यालयात या
कार्यालयातील जे खूप आवश्यक आहे ते कामकाज सुरू राहील. तथापी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की खूप आवश्यक असेल तरच शासकीय कार्यालयात यावे. विनाकारण गर्दी करू नये असे आव्हान पुरंदरच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे