कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णामुळे खळबळ

दौंड, दि .३० मे २०२० : कुरकुंभ (ता.दौंड ) येथील औद्योगीक क्षेत्रातील नामवंत कंपनीत कोरोना बाधीत रुग्ण आढळला असल्याने कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

रुग्ण हा अंबरनाथ (मुंबई) येथुन सोमवार (दि.२५) रोजी कुरकुंभ येथील कंपनीत आला होता. कुरकुंभ येथे आल्यावर त्याला त्रास जाणवू लागल्याने त्याला दौंड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यानुसार त्याची तपासणी केली असता तो कोरोना बाधीत असल्याची माहिती सदर रुग्णालयाने शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे त्या रुग्णास आता दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर त्याच्या संपर्कातील इतर चार जणांची तपासणी होणार असून सध्या त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी अशोक रासगे यांनी दिली आहे.

औद्योगीक क्षेत्रातील अनेक औषध उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांना उत्पादनासाठी परवानगी देण्यात आल्या आहेत. यामध्ये अन्य जीवनाश्यक वस्तुंच्या मध्ये उपयोगात येणाऱ्या पदार्थांचे उत्पादन करणारे प्रकल्प देखील सुरु आहेत परिणामी मोठ्या प्रमाणात पुणे मुंबई व इतर ठिकाणाहून येणाऱ्या अधिकारी व कामगारांची संख्या लक्षणीय आहे. लॉक डाऊनच्या अगदी शेवटच्या टप्प्यात या औद्योगीक क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे चिंतेत भर पडली आहे.विविध प्रकारच्या खबरदारी घेऊन देखील अश्या प्रकारच्या घटनेने प्रकल्पातील वैद्यकीय सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

ग्रामस्थांच्या मागणीला केराची टोपली

कुरकुंभ एमआयडीसीत पुणे,मुंबई व इतर बाधीत क्षेत्रातून येणाऱ्या अधिकारी वर्गाला तालुक्यातच राहण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी कुरकुंभ पांढरेवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून करण्यात येत होती मात्र प्रकल्पांनी जिल्हाधिकारी,तहसीलदार यांच्या परवानगीने बाधीत क्षेत्रात ये जा सुरूच ठेवल्याने हि परिस्थिती ओढवली असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.त्यामुळे आता इतर कंपनीतील वैद्यकीय सुविधा तपासण्याची वेळ आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: रिजवान शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा