कोरोना रुग्णांच्या जेवणात टाचण्या, अळ्या, गांडूळ आणि खिळे

पुणे, २६ जून २०२० : पुणे येथे गोदावरी होस्टेल, सिंहगड कॉलेजमध्ये विलीगीकरण केलेल्या रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण देऊन आणि अपमानास्पद वागणूक देऊन शासन-प्रशासनाने असंवेदनशीलता, हलगर्जीपणाची सीमा गाठली आहे. २४ जून रोजी संबंधित ठिकाणी असलेल्या रुग्णांच्या जेवणामध्ये अळ्या, गांडूळ, टाचण्या आणि खिळे देखील सापडले आहेत. रुग्णांनी याबद्दलची तक्रार केल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अपशब्द वापरून जाणीवपूर्वक रुग्णांचा अपमान केला आहे. ‘जेवण करायचे असेल तर करा नाहीतर मरा’ अशी मुजोरीची भाषादेखील वापरली आहे.

सदर केंद्रामध्ये असलेले रुग्ण पुण्यातील गरीब वस्त्यांमधून आलेले आहेत. गरीब लोकांसोबत शासन-प्रशासन नेहमीच हीनतेची वागणूक देते हेच पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. कोविड १९ सारख्या महामारीमध्ये देखील गरीब रुग्णांसोबत अशी अपमानजनक वागणूक थांबलेली नाही.

कोविड १९ चे असलेले हे रुग्ण संक्रमित आहेत कि नाही याबद्दलचा कोणताही लेखी अहवाल दिलेला नाही. केवळ तोंडी माहितीच्या आधारे अहवाल सांगणे कितपत योग्य आहे? विलीगीकरण केंद्रावर निवासी डॉक्टरांची व्यवस्था का केली जात नाही? रुग्णांना तोंडपट्टी [मास्क], सॅनिटायझर आणि हातमोजे का दिले गेले नाहीत? असा प्रश्न त्रिशूल डी. एन. यांनी न्यूजअनकट शी बोलताना मांडला. तसेच कोरोनावर प्रभावी उपायांचा दावा करणाऱ्या शासन-प्रशासनाचे थोतांड, आणि गरिब-कष्टकरी जनतेप्रती असलेली भेदभावाची वागणूक हे पुन्हा एकदा उघड झाले आहे, असे वक्तव्य देखील त्रिशूल यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा