नवी दिल्ली: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका कनिका कपूरमध्ये कोरोना विषाणूची पुष्टी झाली आहे. तिचे संपूर्ण कुटुंब लखनऊच्या अलगाव वॉर्डमध्ये दाखल झाले आहे. ९ मार्च रोजी लंडनहून भारतात परतलेली कनिका कपूर अधिकाऱ्यांना चकमा देत विमानतळाबाहेर गेली होती असा आरोप आहे. मात्र, कनिका कपूर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की स्क्रीनिंग झाली होती पण त्यांना अलिप्त राहण्याचा सल्ला देण्यात आला नाही.
पण कोरोनाबद्दल बेजबाबदार असलेल्या बॉलिवूड गायिका कनिका कपूर यांच्याविरोधात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये असे स्पष्ट झाले आहे की कनिका कपूरला तिच्या कोरोनातील त्रासविषयी माहिती होती. दुसरीकडे लखनऊचे पोलिस आयुक्त सुजित पांडे यांनी सांगितले की, कनिका कपूर यांच्याविरोधात सीएमओ अहवालात तिच्या आगमनाची तारीख १४ मार्च रोजी लिहिलेली आहे, तर ती ११ मार्चला आली होती.
कनिका कपूरला कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती पसरताच लखनऊ, कानपूर आणि जयपूरमध्ये खळबळ उडाली आहे. कारण कनिका कपूर लंडनवरुन भारतात आल्यानंतर या ठिकाणी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये सहभागी झाली होती. कनिका कपूर ज्या पार्टीमध्ये सहभागी झाली होती त्या पार्टीमध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, भाजप खासदार दुष्यंत सिंह आणि उत्तर प्रदेशचे मंत्री प्रताप सिंह सहभागी झाले होते. यासर्वांची तपासणी करण्यात आली असून त्यांनी स्वत:ला विलग केले आहे.
लखनऊमध्ये आयोजित केलेल्या पार्टीमध्ये ५०० पेक्षा अधिक जण सहभागी झाले होते. यामध्ये अनेक दिग्गज नेते देखील सहभागी झाले होते. पोलिस आता सर्व लोकांची यादी तयार करत आहे. या सर्वांची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, कनिका कपूर काही दिवसांपूर्वीच लंडन येथून भारतात आली होती. लखनऊ येथील ताज हॉटेलमध्ये ती थांबली होती. त्यानंतर शालीमार ग्रँड अपार्टमेंटमध्ये आयोजित केलेल्या एका पार्टीत ती सहभागी झाली होती. यावेळी तिच्या संपर्कात अनेक लोकं आली होती.