मुंबई, दि. २ मे २०२० : कोरोनाचा सर्वाधिक कहर देशातील कोणत्या राज्यात असेल तर ते आहे महाराष्ट्र. राज्यात कोविड १९ ने संक्रमित झालेल्यांची संख्या १० हजारांच्या पुढे गेली आहे. त्यातही मुंबईत सर्वाधिक कोरोना संक्रमण झाले आहे. हे लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने कोरोना चाचणीसाठी एक अनोखी पद्धत आखली आहे. मुंबईत राहणाऱ्या लोकांना आता फिरत्या क्लिनिकमध्ये कोरोनाची चाचणी घेता येणार आहे.
बीएमसीने एक बस तयार केली आहे ज्यामध्ये कोणालाही त्यांची चाचणी घेता येईल. यामध्ये संपूर्ण प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. आता ही चालती बस ज्या त्या भागात जाऊन कोरोनामधील संशयित लोकांचा शोध घेण्यास सक्षम असेल.
बीएमसीच्या या विशेष बसमध्ये कोरोना चाचणीची सर्व सामग्री तसेच एक्स-रे चाचणी करण्यासाठी आधुनिक प्रयोगशाळा असेल. बीएमसीने या मोहिमेला ‘कोरोना टेस्ट ऑन व्हील्स’ असे नाव दिले आहे. ही बस रेड किंवा ऑरेंज झोन असणार्या प्रत्येक भागात जाईल. क्लाउड ट्रान्सफॉर्म टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून रेडिओलॉजी विभागाच्या तज्ञ आणि डॉक्टरांच्या मदतीने मुंबईतील कोरोनाचे रुग्ण लवकरात लवकर सापडतील. बीएमसी आता अशा आणखी बसेस बनवणार आहे. त्यांचा वापर बीएमसी रुग्णालयांमध्ये केला जाईल.
आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत या चालत्या बसचे उद्घाटन करण्यात आले. कोरोना विषाणूंविरूद्ध युद्धात ही ‘कोरोना टेस्ट ऑन व्हील्स’ उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा सरकार करीत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी