मुंबई, 9 जून 2022: महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव सुरू झालाय. बुधवारी कोरोनाचे 2701 नवीन रुग्ण आढळले. मात्र, या आजाराने कोणाचाही मृत्यू झाला नाही. राज्यात आतापर्यंत 9806 सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी कोरोनाची लागण झालेल्या 1327 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 77,41,143 रुग्णांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आलंय. गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे 564 नवीन रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.0 टक्के आहे. तर मृत्यूदर 1.87 टक्के आहे. राज्यात आतापर्यंत 8,11,54,970 नमुन्यांपैकी 78,98,815 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 28,857 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत देशात 5,233 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 3,345 लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 7 जणांना कोरोनामुळं आपला जीव गमवावा लागला आहे.
दिल्लीत कोरोनाचे रुग्ण वाढले, एकाचा मृत्यू
गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे 564 नवीन रुग्ण आढळले आहेत. राष्ट्रीय राजधानीत सकारात्मकता दर 2.84 टक्के आहे. तर 406 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. बुधवारी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या 1691 आहे आणि रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या 79 आहे.
मंगळवारी आढळला BA.5 व्हेरिएंट
राज्यात मंगळवारीही बीए.5 व्हेरिएंटचा रुग्ण आढळून आला होता. एका महिलेमध्ये BA.5 संसर्ग आढळून आला. बीजे मेडिकल कॉलेजच्या मते, जीनोम सिक्वेन्सिंगच्या नवीन अहवालानंतर, पुण्यातील 31 वर्षीय महिलेला बीए.5 व्हेरिएंटचा त्रास असल्याचं आढळून आलं.
उल्लेखनीय आहे की 28 मे रोजी महाराष्ट्रात BA.4 चे चार आणि BA.5 चे तीन रुग्ण आढळले होते. त्यानंतर 7 जून रोजी महिलेमध्ये बीए.5 ची लक्षणं आढळून आली. Omicron चे सब-व्हेरिएंट BA.4 आणि BA.5 हे देशातील कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ होण्यास कारणीभूत असल्याचं मानलं जातं.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यानंतर लोकांना मास्क घालून सामाजिक अंतर पाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. चार महिन्यांनंतर मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे इतके रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे