कोरोनाचे सत्य आणि प्रशासनावरील ताण

कोरोना महामारी सुरू झाल्यापासून सर्वच उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी देशात लॉकडाऊन वाढतच आहे. त्यात सर्व प्रशासन आपल्या परीने परिस्थिती हाताळण्याचे काम करत आहेत. मात्र या परिस्थितीचा सर्वात जास्त ताण पोलीस प्रशासनावर येताना आता दिसू लागले आहे. कारण पोलिसांमधून कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असून त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. या कडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

त्यात मुंबई सारख्या ठिकाणी कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलीस प्रश्नासनाचा ताणही तेवढाच वाढत आहे. प्रशासनाची वास्तव परिस्थिती आता समोर येऊ लागली आहे. सरकारला एकच सांगणं आहे की, ज्यांना आपल्या गावाकडे जायचं आहे. त्यांना जाऊ द्या. निदान मारणाऱ्या माणसांना तरी त्यांच्या नातेवाईकांना भेटू द्या. भेटू न देण्याची कारणे आहे ना, म्हणूनच सरकारने हे नियम केले आहेत. सर्वांसाठी ते सारखेच आहेत.

अमोल कुलकर्णी या तरुण पोलिस अधिकाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी आपण वाचली. अमोल कुलकर्णी मुळचे शिराळ्याचे. माझा त्यांचा परिचय नव्हता, परंतु तालुक्यातला माणूस म्हणून मी काही मित्रांकडे चौकशी केली. अमोल कुलकर्णींचे पोलिस दलातले काही मित्र माझेही मित्र आहेत. त्यांच्याकडून अमोल संदर्भातील जी माहिती कळाली ती हादरवून टाकणारी आहे. मुंबईतल्या एकूण व्यवस्थेची, पोलिसांच्या दयनीय अवस्थेची आणि सरकारी यंत्रणेच्या निबरपणाची लक्तरे वेशीवर टांगणारी आहे. सरकारला दोष देऊन उपयोग नाही, कारण कोरोनामुळे सर्वांनाच ही परिस्थिती हाताळावी लागत आहे. काही गोष्टीत वास्तव जरी असल्या तरी त्या स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. कारण जो स्वतःचे रक्षण स्वतः करेल तोच जगेल अशी परिस्थिती आता निर्माण होऊ लागली आहे.

पोलिसांचे यात बळी जात आहे. धारावीतल्या शाहूनगर पोलिस ठाण्यात अमोल कुलकर्णी सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून सेवेत होते. तडफदार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित होते. धारावीसारख्या संवेदनशील परिसरात झोकून देऊन काम करणाऱ्या अमोलना दहा/अकरा तारखेला ताप आला. त्यानंतर ते सायन हॉस्पिटलला गेले तर तिथं त्यांना सांगण्यात आलं की, तुम्ही घरीच क्वारंटाइन राहा. त्यांनी बारा तारखेला कोविड टेस्ट केली आणि घरीच विश्रांती घेत होते. बारा तारखेला केलेल्या टेस्टचा रिपोर्ट पंधरा तारखेला रात्री आला, तो पॉझिटिव्ह होता. (कोविड टेस्टच्या रिपोर्टसाठी चार दिवस लागतात ही यातील गंभीर बाब.) त्याच रात्री त्यांचा त्रास वाढत गेला आणि पहाटे ते अत्यवस्थ झाले. त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. परंतु १०८ नंबर किंवा सरकारी अँब्युलन्स उपलब्ध होऊ शकली नाही. अर्ध्या तासाने खासगी अँब्युलन्स उपलब्ध झाल्यावर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले तोपर्यंत खेळ खल्लास झाला होता. (पोलिस अधिकाऱ्यांनाही अर्धा तास अँब्युलन्स मिळू शकली नाही.) सकाळी साडेसात वाजता त्यांना मृत घोषित केले. करोना पॉझिटिव्ह असल्यामुळे पार्थिव देह काळ्या पिशवीत घालून शवागरात रवाना करण्यात आला. त्यांचे जे मृत्यू प्रमाणपत्र आले त्यावर मृत्यूचे कारण श्वसनक्रिया बंद पडणे, उच्च रक्तदाब आणि मधुमेह असे लिहिण्यात आले. म्हणजे करोनामुळे मृत्यू झालेल्या एका पोलिस अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रमाणपत्रावर ते कारणही लिहिले नव्हते. तिथं उपस्थित असलेल्या अमोलच्या काही मित्रांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला आक्षेप घेतला. प्रमाणपत्रात कोविड १९ चा उल्लेख करण्याची मागणी केली, तर डॉक्टर आता निघून गेले आहेत, उद्या बघू असे उत्तर देण्यात आले. अमोल कुलकर्णी ज्या शिराळ्याचे आहेत, तेथील आमदार मानसिंगराव नाईक गायकवाड यांच्याकडे हा विषय गेल्यानंतर त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोलून घेतल्यानंतर मग सूत्रे हलली आणि मृत्यू प्रमाणपत्रात कोविड१९ चा उल्लेख करून ते बदलून देण्यात आले. म्हणजे एका पोलिस अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठीही संघर्ष करावा लागला. पोलिस यंत्रणा एवढी तणावाखाली आणि कामात आहे की, आपल्या एका अधिकाऱ्याचा कोविडने मृत्यू झाला असताना वरिष्ठ अधिकारी हॉस्पिटलमध्येही उपस्थित राहू शकले नाहीत. सायंकाळी गृहमंत्री अनिल देशमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्याला भेट देऊन आदरांजली वाहिली.

अमोल यांच्यामागे पत्नी आणि लहान मुलगी आहे. त्यांची टेस्ट आता केली आहे, त्यांचा रिपोर्ट काय येतोय याची चिंता नातलग आणि मित्रपरिवाराला आहे. त्यांच्या पत्नीने फोन वरूनच सांगितले की, साहेब, तुम्हीच करा त्यांच्यावर अंत्यसंस्कार, कारण त्यांच्यापर्यंत पोहचणे अशक्य होते.

कोविड पॉझिटिव्ह व्यक्तिवर अंत्यसंस्कार महापालिकेची यंत्रणाच करीत असते. गावाकडून अमोल यांचे कुणी नातलग येऊ शकले नाहीत. अमोलच्याच एका बॅचमेट मित्राने त्याला अखेरची सलामी दिली आणि एक कोविड योद्धा अनंतात विलीन झाला.

एखाद्या अधिकाऱ्याबाबत अशा गोष्टी घडत असतील तर सामान्य माणसाचे काय परिस्थिती असेल.आज सरकार जरी म्हणत असेल. परिस्थिती कंट्रोल मध्ये आहे. मात्र, वास्तव आता समोर येताना पहायला मिळत आहे. पोलीस प्रशासनावरील ताण यातून समोर येऊ लागला आहे. अशी परिस्थिती आता समोर येऊ लागली आहे. याला सरकारचा नाकर्तेपणा म्हणता येणार नाही, कारण अमेरिका, इटली, सारख्या देशांसारख्या मोठ्या अर्थव्यस्था कोलमडून पडल्या आहेत तर भारताची अर्थव्यवस्था त्या पुढे गौण आहे. त्यामुळे ही परिस्थिती सर्वांनी मिळून हाताळणे गरजेचे आहे. जो स्वतःच रक्षण करेल तोच जगेल अशी परिस्थिती सध्या निर्माण होऊ लागली आहे.

सौजन्य – विजय चोरमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा