गुजरात, १२ डिसेंबर २०२२: गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. भाजप सलग सातव्यांदा सत्तेत परतलाय. यावेळी विधानसभेत पोहोचलेल्या १८२ आमदारांपैकी ४० आमदार गुन्हेगारी प्रकरणात अडकले आहेत. भाजपचा एक आमदार बलात्कार प्रकरणात आरोपी आहे. तर काँग्रेस, आप आणि भाजपचा प्रत्येकी एक आमदार विनयभंगाच्या प्रकरणात आरोपी आहे. मात्र, गतवेळच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत गुन्हेगारी गुन्ह्यातील आरोपींची संख्या घटलीय.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि गुजरात इलेक्शन वॉचनं सर्व १८२ आमदारांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांचं विश्लेषण केलंय. वृत्तानुसार, ४० नवनिर्वाचित आमदारांवर फौजदारी खटले प्रलंबित आहेत. एडीआरच्या विश्लेषणातून असं दिसून आलंय की या ४० आमदारांपैकी २९ सदस्य (एकूण १८२ पैकी १६ टक्के) गंभीर गुन्हेगारी प्रकरणात गुंतलेले आहेत. खुनाचा प्रयत्न, बलात्कार असे गंभीर आरोप आहेत. या २९ सदस्यांपैकी २० भाजपचे, ४ काँग्रेसचे, २ आम आदमी पार्टीचे, २ अपक्ष आणि एक समाजवादी पक्षाचा आहे.
भाजपच्या २६ आमदारांवर गुन्हे दाखल
गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल ८ डिसेंबरला लागला. भारतीय जनता पक्षाने (भाजप) विक्रमी १५६ जागा जिंकल्यात. काँग्रेसने १७ तर ‘आप’ने ५ जागा जिंकल्या आहेत. ADR अभ्यासात, भाजपचे १५६ पैकी २६ आमदार (१७ टक्के), काँग्रेसचे १७ पैकी ९ (५३ टक्के), AAP ५ पैकी २ आमदार (४० टक्के), ३ पैकी २ अपक्ष (६८ टक्के) आणि एकमेव समाजवादी पक्षाचे आमदार कंधल जडेजा यांनी त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित असल्याचं जाहीर केलंय.
२०१७ मध्ये ४७ आमदारांवर खटले प्रलंबित होते
ADR ने गुजरातमधील सर्व १८२ नवनिर्वाचित आमदारांच्या शपथपत्रांचं विश्लेषण करून हा अहवाल तयार केलाय. २०१७ च्या तुलनेत गुन्हेगारी खटल्यांचा सामना करणाऱ्या आमदारांच्या संख्येत घट झाल्याचं अभ्यासात म्हटलंय. यापूर्वी निवडून आलेल्या ४७ सदस्यांवर फौजदारी खटले होते.
तीन आमदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप
तिन्ही आमदारांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात असं जाहीर केलंय की, त्यांच्यावर आयपीसी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत खटले सुरू आहेत. वांसदा येथील काँग्रेसचे आमदार अनंत पटेल, पाटणचे काँग्रेस आमदार किरीट पटेल आणि उना येथील भाजपचे आमदार कालूभाई राठोड हे उमेदवार आहेत.
हे आमदार महिलांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये आरोपी
आयपीसी कलम ३५४ (महिलांचा अपमान/विनयभंग) किंवा कलम ३७६ (बलात्कार) अंतर्गत ४ आमदारांचा सहभाग असल्याचंही या अभ्यासातून समोर आलंय. या आमदारांवर महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. या ४ पैकी भाजपचे जेठा भारवाड यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. तर काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी, भाजप आमदार जनक तलाविया आणि आप आमदार चैत्रा वसावा यांच्यावर आयपीसी कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे