आठवडाभरात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट

कर्जत, दि. २४ जून २०२०: पहिल्या चार-पाच दिवस मान्सूनच्या आगमनाने जोरदार हजेरी लावलेली असताना आठवडाभरात जिल्ह्यात कुठेच समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजा चिंतेत आहे. या आठवड्यात पावसाने हजेरी न लावल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांवर ओढावू शकते. मान्सूनच्या पहिल्या पावसाच्या बळावर बहुतेक शेतकर्‍यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या.

मात्र, गेल्या आठदिवसापासून वरूणराजा कुठेच बरसलेला नाही. मागील दोन दिवसात तर परवा जामखेड व काल श्रीरामपूर येथील थोडासा अपवाद वगळता जिल्हा निरंक आहे.

मान्सूनच्या पहिल्याच आठवड्यात कर्जत, श्रीगोंदा, राहुरी, अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, पारनेर, राहाता आदी तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावली. मात्र आठ दिवसापासून पाऊस गायबच झाला आहे. कुठेतरी हलक्या सरी होत आहेत. आभाळ नुसतेच भरून येते. मात्र वरूणराजा बरसत नाही. त्यामुळे शेतकरी आभाळाकडे आशाळभूत नजरेने डोळे लावून बसला आहे. या आठवड्यात पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट येवू शकते.

कोरोनामुळे आर्थिक व्यवस्था खालावलेली असतानाही शेतकर्‍यांनी कर्ज घेवून वा उधारीवर महागाची बियाणे खरेदी करून पेरणी केली. जर पावसाअभावी शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट आले तर शेतकरी कोलमडला जाण्याची भिती आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा