मोदींच्या कोव्हिड स्थिती हाताळण्याच्या अपयशा वरून टीका, सरकारने अनेक ट्विट हटवले

नवी दिल्ली, २५ एप्रिल २०२१: भारतात कोरोनाने थैमान घातलंय. दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांनी ३ लाखांचा टप्पा पार केलाय. त्यात रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसिव्हीर, कोरोना लस यांचा तुटवडा झाल्याचीही स्थिती तयार झालीय. अनेक ठिकाणी रुग्णांना बेडही मिळत नसल्याची परिस्थिती तयार झालीय. अशातच दररोज कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही २००० च्या वर गेलीय. त्यावरुनच विरोधकांसह पत्रकारांकडूनही मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ले करण्यात येत आहेत. सध्या ट्विटर वर देखील मोदींना लक्ष्य करत कोव्हिड १९ ची स्थिती हाताळणे मध्ये सरकार अपयशी ठरले आहे यावरून ट्विटरवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

केंद्र सरकार कोव्हिड १९ ची स्थिती हाताळण्यात मध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहे. तसेच अशा परिस्थितीत देखील कुंभमेळा ला परवानगी का दिली, यावरून देखील मोदींवर टीका केल्या जात आहे. ट्विटरवर अनेक नेत्यांनी तसेच पत्रकारांनी अशा टीका केल्या आहेत. सरकारने असे ट्विट काढून टाकण्यासाठी ट्विटर इंडियाला सांगितले आहे. केंद्र सरकारने याबाबत मागणी केल्यानंतर ट्विटर इंडियाने अशी ५० ट्विट्स हटवले आहेत.

काय आहे ट्विट्समध्ये

यात मोदींच्या राजीनाम्याच्या मागणीपासून त्यांची तुलना निरो राजाशी करणं आणि कुंभमेळ्याला परवानगी देण्यावरुन केलेल्या ट्विट्सचा समावेश आहे. यात आमदार, खासदार, पत्रकार आणि सेलिब्रेटिंच्या ट्विट्सचाही समावेश आहे. केंद्र सरकारच्या मागणीनंतर ट्विटरने हटवण्यात आलेल्या बहुतांश ट्विट्समध्ये कोरोना परिस्थिती हाताळण्यावरुन पंतप्रधान मोदींवर प्रखर टीका केलेली होती. तसेच कठोर प्रश्न विचारण्यात आले होते.

केंद्र सरकारने कोविड परिस्थिती हाताळण्यावरुन टीका करण्यात आलेले काही ट्विट्स भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्यांचं उल्लंघन करत असल्याचं सांगत ट्विटरला ट्विट्स हटवण्यास सांगितले होते. त्यानंतर ट्विटरने संबंधित ट्विट करणाऱ्यांना नोटिफिकेशन देत भारतापुरते हे ट्विट्स हटवले आहेत.

कोणत्या दिग्गजांचे ट्विट्स हटवले?

ट्विटरने हटवलेल्या ट्विट्समध्ये व्हेरिफाईड ट्विटर अकाऊंट्सचाही समावेश आहे. यात काँग्रेसचे नेते रेवंथ रेड्डी, पवन खेरा, पश्चिम बंगालमधील मंत्री मोली घटक, चित्रपट निर्माते अविनाश दास, पत्रकार आणि निर्माते विनोद कापरी अशा अनेकांचे ट्विट्स हटवण्यात आलेत. मोली दास यांच्या हटवण्यात आलेल्या ट्विटमध्ये झोपडीत झोपलेल्या रुग्णाचा फोटो ट्विट करत तो तापी जिल्ह्यातील असल्याचा दावा केला होता. तसेच हे गुजरातच्या आरोग्य व्यवस्थेचं प्रातिनिधिक चित्र असल्याचा आरोप केला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा