उस्मानाबाद, २८ जुलै २०२०: पिक विमा ऑनलाईन प्रक्रियेत ७अ / १२ ब, ८अ उतारे दिसून येत नसल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास १५५ गावांमधून ८५० शेतकऱ्यांनी त्यांचे ७अ/१२ ब, ८अ उतारे ऑनलाईन दिसत नसल्याच्या तक्रारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे केल्या आहेत. अशाच अडचणीत असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी ही केलेल्या नाहीत.
या आगोदर काही गावे ऑनलाईन दिसत नसल्यामुळे व कोरोना संकटातील आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यास विलंब झाला आहे. राज्यातील इतर काही जिल्ह्यामध्ये देखील हीच परिस्थिती आहे.
त्यामुळे ऑफलाईन विमा स्वीकारण्यासह पीक विमा भरण्यास १५ दिवसांची मुदत वाढ देणेबाबत केंद्र सरकारला विनंती करावी तसेच तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे ऑफलाईन पीक विमा हप्ता स्वीकारण्यास विमा कंपन्यांना आदेशीत करावे, अशी मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी कृषी मंत्री ना.दादाजी भुसे यांच्याकडे केली असल्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून सांगितले.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड