पुणे, दि.४ मे २०२०: आपल्या घरी जाण्यासाठी परराज्यातील लाखो कामगारांनी वारजे माळवाडी येथील पुलाखाली गर्दी केली होती. ही वाढलेली गर्दी पाहून पोलिसांना याठिकाणी लाठीमार करावा लागला. अशी माहिती वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.
उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यातील कामगारांचा यात समावेश आहे. या पुलाखाली आपल्या राज्यांत कसे जावे, यासंबंधीचे पत्रक लावण्यात आले होते.
पुण्यात कोरोनाचे संकट गंभीर असल्याने परप्रांतीय मजूरांमध्ये भीती निर्माण झाली आहे. आपापल्या राज्यात जायला मिळावे, यासाठी हे मजूर एकत्र आले. वारजे पुलाखाली मजूरअड्डा भरत असतो. त्याच ठिकाणी गर्दी होत असल्याने बहुधा आपल्याला गावी जायला मिळणार, हि बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे येथे जवळपास १००० मजूर एकत्र जमले होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी सौम्य लाठीमार करून कामगारांना पांगवले.
पुण्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने परप्रांतीय मजूरांना आपल्या गावाकडे जाण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे दुपारनंतर वारजे गावठाण येथील बराटे चाळीत परप्रांतीय मजूरांची यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आलेे , मात्र अचानक गर्दी वाढल्याने हा लाठीमार करण्यात आला.
न्युज अनकट प्रतिनिधी: