गोल पोस्ट agralekh समाजमाध्यमांवर अंकुश

समाजमाध्यमांवर अंकुश

अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील ज्यूरीने मेटा आणि यूट्युब या प्लॅटफॉर्मवर दंड ठोठावून दिलेला निकाल हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या निकालात समाजमाध्यम कंपन्यांनी वापरकर्त्यांना जाणीवपूर्वक व्यसनाधीन बनवणाऱ्या तंत्रांचा वापर केल्याचे नमूद करण्यात आले. यामुळे केवळ कंपन्यांच्या जबाबदारीचा प्रश्न उपस्थित झाला नाही, तर डिजिटल नैतिकतेबाबतही व्यापक चर्चा सुरू झाली आहे. डिजिटल क्रांतीने मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले; परंतु या बदलांचा सर्वाधिक प्रभाव जर कोणावर पडत असेल, तर तो लहान मुलांवर आणि किशोरवयीन पिढीवर. आजची पिढी ही ’डिजिटल नेटिव्ह’ म्हणून ओळखली जाते. जन्मापासूनच मोबाईल, इंटरनेट आणि समाजमाध्यमांच्या सहवासात वाढणारी; मात्र या सुलभ उपलब्धतेमुळे निर्माण झालेली आहारी जाण्याची प्रवृत्ती ही चिंतेचा गंभीर विषय बनली आहे. समाजमाध्यमे ही संवाद, माहिती आणि अभिव्यक्तीचे प्रभावी साधन असली, तरी त्यांचा अतिरेकी वापर मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक विकासावर विपरीत परिणाम करत आहे. सतत स्क्रीनसमोर घालवलेला वेळ, आभासी जगात मिळणाऱ्या मान्यतेची भूक आणि तुलना करण्याची सवय यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास कमी होणे, नैराश्य, चिंता आणि एकटेपणा यांसारख्या समस्या वाढताना दिसतात. ‘फोमो’ (फीअर ऑफ मिसिंग आऊट) ही संकल्पना तर आता बालवयातच रुजली आहे. इतर काय करत आहेत, कोण कुठे फिरायला गेले, कोणाला किती लाइक्स मिळाले या सगळ्यामुळे मुलांच्या मनात सतत अस्वस्थता निर्माण होते. याहूनही गंभीर बाब म्हणजे समाजमाध्यमांवरील सामग्रीचे स्वरूप. हिंसक, अश्लील किंवा दिशाभूल करणारी माहिती सहज उपलब्ध होत असल्याने मुलांच्या विचारसरणीवर त्याचा परिणाम होतो. ‘सायबर बुलिंग’ ही तर आणखी एक गंभीर समस्या आहे. त्यामुळे अनेक मुलांच्या मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होत आहेत. काही प्रकरणांमध्ये तर या तणावामुळे टोकाचे पाऊल उचलण्याचेही प्रकार समोर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर जगभरातील न्यायालये आणि सरकारे जागरूक होत आहेत. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स यांसारख्या देशांनी मुलांच्या समाजमाध्यम वापरावर मर्यादा घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काही ठिकाणी ठरावीक वयाखालील मुलांसाठी ‘सोशल मीडिया’ वापरावर बंदी, तर काही ठिकाणी पालकांच्या संमतीची अट घालण्यात आली आहे. या उपाययोजनांचा उद्देश मुलांना सुरक्षित डिजिटल वातावरण उपलब्ध करून देणे हा आहे.

भारतामध्येही या प्रश्नाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विविध राज्यांमध्ये शाळांमध्ये मोबाईल वापरावर निर्बंध, विद्यार्थ्यांसाठी डिजिटल साक्षरता अभियान, तसेच पालकांना जागरूक करण्यासाठी मोहिमा राबवण्यात येत आहेत; मात्र अद्याप देशपातळीवर एकसंध आणि कठोर कायदेशीर चौकट अस्तित्वात नाही, ही वस्तुस्थिती आहे. परिणामी, या समस्येवर उपाययोजना विखुरलेल्या स्वरूपात दिसतात. या पार्श्वभूमीवर एक मूलभूत प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे समाजमाध्यमांवर पूर्ण बंदी घालावी का, की संतुलित वापराला प्रोत्साहन द्यावे? पूर्ण बंदी हा कदाचित व्यवहार्य उपाय नाही, कारण समाजमाध्यमे ही आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत; मात्र त्यांचा वापर नियंत्रित, जबाबदारीने आणि जाणीवपूर्वक होणे अत्यावश्यक आहे. यासाठी तीन स्तरांवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. पहिला स्तर म्हणजे कुटुंब, पालकांनी मुलांच्या डिजिटल सवयींवर लक्ष ठेवणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि पर्यायी उपक्रमांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. दुसरा स्तर म्हणजे शैक्षणिक संस्था, शाळांनी डिजिटल साक्षरतेचा भाग म्हणून समाजमाध्यमांच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. तिसरा स्तर म्हणजे सरकार आणि न्यायव्यवस्थेने कडक नियम, वयोमर्यादा, डेटा संरक्षण आणि प्लॅटफॉर्मच्या जबाबदारीची अंमलबजावणी सुनिश्चित करणे. समाजमाध्यमे ही संधीही आहेत आणि आव्हानही. योग्य वापर केल्यास ती ज्ञान, संवाद आणि प्रगतीचे साधन ठरू शकतात; परंतु अतिरेक केल्यास ती मानसिक गुलामगिरीचे कारण बनू शकतात. त्यामुळे आजची गरज ही नियंत्रण आणि स्वातंत्र्य यामधील समतोल साधण्याची आहे. बालपिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी समाजाने, शासनाने आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी एकत्रितपणे जबाबदारी उचलण्याची वेळ आता आली आहे. डिजिटल युगात ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्म हे केवळ संवादाचे माध्यम राहिलेले नाहीत, तर ते आजच्या किशोरांच्या व्यक्तिमत्त्वावर, विचारसरणीवर आणि वर्तनावर खोलवर परिणाम करणारी प्रभावी साधन बनले आहे. अशा परिस्थितीत, सरकार किंवा न्यायव्यवस्थेकडून या मंचांवर नियंत्रण आणण्यासाठी घेतलेले ठोस पाऊल केवळ निर्बंध म्हणून न पाहता सामाजिक जबाबदारीच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. अलीकडेच किशोरांच्या सुरक्षिततेला आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी घेतलेला निर्णय हा नक्कीच ऐतिहासिक उपक्रम म्हणून पाहिला जाऊ शकतो.

ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी मुलांच्या ‘सोशल मीडिया’ वापरावर बंदी घालण्यासाठी किंवा त्यावर मर्यादा आणण्यासाठी निर्बंध लागू केले आहेत. त्याच वेळी ब्रिटन सध्या एक पायलट कार्यक्रम राबवत आहे. त्यात १६ वर्षांखालील मुलांसाठी ‘सोशल मीडिया’वर बंदी कशी प्रभावी ठरू शकते, याचा अभ्यास केला जात आहे. फेब्रुवारी महिन्यात ज्यूरीसमोर हजर होताना मेटा प्लॅटफॉर्मचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी त्यांच्या कंपनीच्या दीर्घकाळ चालत आलेल्या धोरणाचा आधार घेतला. त्यात १३ वर्षांखालील वापरकर्त्यांना त्यांच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास परवानगी दिली जात नाही. जेव्हा काही अंतर्गत संशोधन आणि कागदपत्रे सादर करण्यात आली, तेव्हा त्यातून हे स्पष्ट होत होते, की लहान मुले प्रत्यक्षात त्यांच्या प्लॅटफॉर्मचा वापर करत होती. मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले, की आम्ही नेहमीच १३ वर्षांखालील वापरकर्त्यांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याची इच्छा ठेवली आहे. कालांतराने कंपनी या ओळख प्रक्रियेत ‘योग्य स्थिती’पर्यंत पोहोचली आहे. व्हिडीओ-शेअरिंग साइट ‘यूट्युब’ चे मालक म्हणून ‘गूगल’ देखील या प्रकरणात प्रतिवादी होते, तरीही खटल्यातील बहुतेक सुनावणी इन्ट्राग्राम आणि मेटावर केंद्रित राहिली. स्नॅप इंक आणि टिकटॉकचाही सुरुवातीला या प्रकरणात समावेश होता; मात्र दोन्ही कंपन्यांनी खटल्यापूर्वीच काही अटींवर समझोता केला. मुलांवर या प्लॅटफॉर्म्समुळे होणाऱ्या कथित दुष्परिणामांबाबत मेटा आणि इतर ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्म्सविरोधात आणखी एक खटला जून महिन्यात कॅलिफोर्नियामधील संघीय न्यायालयात सुरू होणार आहे. गेल्या काही वर्षांत हे स्पष्ट झाले आहे, की अनियंत्रित ‘सोशल मीडिया’ वापरामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. नैराश्य, चिंता, आत्मसन्मानात घट आणि अगदी आत्महत्येच्या प्रवृत्तींमध्ये वाढ यांसारखे गंभीर प्रश्न याच्याशी संबंधित आहेत. आभासी जगात ‘लाइक्स’ आणि ‘फॉलोअर्स’ मिळवण्याच्या स्पर्धेमुळे वास्तविक जीवनातील मूल्ये मागे पडली आहेत. किशोर स्वतःच्या आत्ममूल्याचे मोजमाप डिजिटल निकषांवर करू लागले आहेत, ही अत्यंत धोकादायक प्रवृत्ती आहे. याशिवाय, सायबर छळ (सायबर बुलिंग), बनावट बातम्या (फेक न्यूज) आणि अश्लील किंवा हिंसक आशय सहज उपलब्ध असल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. अशा प्रकारच्या आशयाचे योग्य मूल्यांकन करण्याइतकी परिपक्वता किशोरांमध्ये नसते. त्यामुळे ‘सोशल मीडिया’ कंपन्यांवर त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील सामग्रीचे प्रभावी नियंत्रण आणि देखरेख ठेवण्याची जबाबदारी येते; मात्र आतापर्यंत या कंपन्यांनी नफ्याला प्राधान्य देत ही जबाबदारी गांभीर्याने पार पाडलेली दिसत नाही. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील ज्यूरीने ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्मच्या घातक परिणामांमुळे त्रस्त झालेल्या एका तरुणीच्या बाजूने दिलेल्या ऐतिहासिक निकालामुळे जगभरातील पालकांना दिलासा मिळाला आहे. प्रत्यक्षात, ‘सोशल मीडिया’च्या व्यसनाशी संबंधित एका प्रकरणात मेटा, यूट्युब यांसारख्या प्लॅर्टफॉर्मवर ५६ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उल्लेखनीय म्हणजे, एका तरुणीने मेटा आणि यूट्यूबवर आरोप केला होता, की त्यांच्या प्लॅटफॉर्ममुळे तिला ‘सोशल मीडिया’चे घातक व्यसन लागले. तथापि, आतापर्यंत या कंपन्या स्वतःला केवळ ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्म असल्याचे सांगत, सामग्रीसाठी आपण जबाबदार नसल्याचे सांगत होत्या; मात्र न्यायालयात वकिलांनी पीडितेच्या बाजूने युक्तिवाद करताना असे मांडले, की जाणीवपूर्वक अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहेत, की वापरकर्ते या कथित ‘सोशल मीडिया’ व्यसनाचे बळी ठरतील. सुरुवातीपासून आपली ओळख गोपनीय ठेवणाऱ्या २० वर्षीय केलीच्या वकिलांचा युक्तिवाद ज्यूरीने मान्य केला, की या व्यसनामुळे तिच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. ज्यूरीने ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्मच्या दाव्यांना नाकारत मेटा आणि यूट्यूबला ६० लाख अमेरिकन डॉलर, म्हणजेच सुमारे ५६ कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. ज्यूरीने असेही नमूद केले, की ‘गूगल’ आणि ‘मेटा’ने आपल्या नफ्याच्या उद्देशाने या प्लॅटफॉर्मच्या संचालनात अनुचित पद्धतींचा अवलंब केला असून, ते अनैतिक आहे. केलीने सांगितले, की तिने वयाच्या नवव्या वर्षी इंस्टाग्राम आणि सहाव्या वर्षी यूट्यूबचा वापर सुरू केला आणि कमी वय असूनही तिला थांबवण्यासाठी प्लॅटफॉर्मकडून कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही. तिने आपल्या साक्षीदरम्यान सांगितले, की मी माझा सगळा वेळ ‘सोशल मीडिया’वर घालवू लागल्यामुळे कुटुंबाशी संवाद साधणे बंद केले होते. ती केवळ दहा वर्षांची असताना तिला चिंता आणि नैराश्याची लक्षणे जाणवू लागली. त्यावर अनेक वर्षांनंतर थेरपिस्टकडून उपचार करण्यात आले.

तिने आपल्या शारीरिक दिसण्याबाबतही अतिविचार सुरू केला आणि इंस्टाग्रामवरील असे फिल्टर्स वापरू लागली, जे तिचा चेहरा बदलून दाखवत होते. हे सर्व तिने अगदी लहान वयात प्लॅटफॉर्म वापरण्यास सुरुवात केल्यानंतर लगेचच सुरू केले होते. तिच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला, की इंस्टाग्राममधील अखंड स्क्रोलिंग जाणीवपूर्वक व्यसनाधीन बनवण्यासाठी डिझाइन करण्यात आली होती. ‘मेटा’ने हे प्लॅटफॉर्म अशा प्रकारे तयार केले, की तरुण वापरकर्ते त्यांचा जास्तीत जास्त वापर करतील. या निर्णयानुसार, दंडाच्या रकमेपैकी ७० टक्के रक्कम ‘मेटा’ने आणि ३० टक्के रक्कम ‘गूगलने भरायची आहे. जगभरात या ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्मविरोधात हजारो खटले सुरू असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. यात अशा अनेक कुटुंबांचाही समावेश आहे, ज्यांच्या मुलांनी ‘सोशल मीडियाच्या व्यसनामुळे टोकाचे पाऊल उचलले आहे. ब्रिटनसह अनेक देशांत पालक आपल्या मुलांना या व्यसनापासून वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत. एवढेच नव्हे, तर अमेरिकामध्येही विविध न्यायालयांमध्ये मुलांना ‘सोशल मीडिया’च्या दुष्परिणामांपासून संरक्षण देण्यासाठी शेकडो खटले प्रलंबित आहेत. या निकालाचा परिणाम जगभरात सुरू असलेल्या इतर खटल्यांवरही होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे; मात्र दोषी ठरवलेल्या ‘सोशल मीडिया’ कंपन्यांचे प्रतिनिधी या निर्णयाशी असहमती दर्शवत असून त्याविरोधात अपील करण्याची तयारी दर्शवत आहेत. त्यांच्या मते, किशोरांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची अनेक कारणे असू शकतात आणि त्यासाठी केवळ ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना जबाबदार धरणे योग्य नाही. भारतासह जगभरातील कोट्यवधी किशोर या व्यसनाच्या विळख्यात अडकत आहेत. त्यामुळेच आठवड्यांपर्यंत चाललेल्या या खटल्यादरम्यान मोठ्या संख्येने पालक न्यायालयात उपस्थित राहून पीडितेच्या बाजूने उभे राहिले. या निर्णयापूर्वी न्यू मेक्सिको येथेही एका ज्यूरीने ‘मेटा’ला जबाबदार धरले होते. त्यांच्या प्लॅटफॉर्मवर प्रौढांसाठी असलेली सामग्री मुलांपर्यंत पोहोचत होती, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात लैंगिक गुन्हेगारांचा धोका वाढला. भारतासह अनेक विकसित आणि विकसनशील देशांमध्ये ‘सोशल मीडिया’च्या मुलांवर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत चिंता व्यक्त होत आहे; मात्र भारतात यासंदर्भात ठोस नियामक कायदा नसल्याने प्रभावी कारवाई होताना दिसत नाही. मुलांच्या शिक्षणावर होणारा परिणाम आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावरील धोके पाहता पालकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळेच जगातील अनेक विकसित देशांमध्ये मुलांना ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्मपासून दूर ठेवण्यासाठी कायदे केले जात आहेत. ऑस्ट्रेलियानंतर फ्रान्स आणि इतर युरोपीय देशही या दिशेने पुढाकार घेत आहेत, जेणेकरून ठरावीक वयानंतरच मुलांना ‘सोशल मीडिया’ वापरण्याची परवानगी मिळेल.

भागा वरखडे

error: Content is protected !!
Exit mobile version