मुंबई, ४ जुलै २०२३: राज्यात नवीन राजकीय समीकरणे तयार झाली आहेत. कालपर्यंत एकमेंकावर गरळ ओकणारे भाजप आणि राष्ट्रवादी आज एकत्र आले आहेत. राष्ट्रवादीचा एक गट भाजपला जाऊन मिळाला असून सत्तेत सहभागी झाला आहे. त्यामुळे राज्यात महायुती तयार झाली असून, महाविकास आघाडीची ताकद कमकुवत झाली आहे. पहिल्यांदाच राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया कमालीच्या संतापल्या आहेत. सध्याचे राज्यातील राजकारण हे अत्यंत गलिच्छ असल्याची घणाघाती टीका दमानिया यांनी केली आहे.
अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवला आहे. काल जो राज्यात मंत्र्यांचा शपथविधी झाला, त्यामुळे मला जाम संताप आला आहे. माझ्या मनात जाम आक्रोश आहे. हे गलिच्छ राजकारण सुरू आहे. त्याला कसे संपवणार? याला राजकारण म्हणायचे की पैसा कमवायचा मार्ग? पूर्वीचे राजकारणी विचार मांडायचे. लोकांना ते पटायचे आणि त्यानुसार वाटचाल करायचे. पण आजच्या स्थितीत राजकारणात भलतच सुरू आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
काहींना तुम्ही राजकारणातील चाणक्य म्हणत आहात. ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून नेत्यांना आपल्या पक्षात ओढणाऱ्या नेत्यांना तुम्ही चाणक्य म्हणणार का? एप्रिलपासून मला माहिती होती आणि या संदर्भात मी ट्विट सुद्धा केले होते. अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असे मी आधीच सांगितले होते. आता आपल्याला तेच पाहायला मिळाले, असेही दमानिया म्हणाल्या.आता काय चालले आहे. ज्यांची ईडीची चौकशी सुरू होती अरे ते आता मंत्रीपदाची शपथ घेत आहेत. नऊ पैकी सात नेत्यांची ईडीची चौकशी सुरू आहे. त्यांना तुम्ही मंत्रीपदाची शपथ दिली. आता हेच नेते तुमच्यासोबत आहेत. हे चाललय काय? या संदर्भात अनेक पुरावे आहेत, असेही त्या म्हणाल्या.
या सात जणांच्या भ्रष्टाचाराबाबत मी देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली होती. त्यांना मी कागदपत्रेही दिली होती. पण त्यांनी कधी गांभीर्याने घेतले नाही. माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. सर्व राजकीय नेत्यांच्या घोटाळ्याचे पुरावे आहेत. पण ते काही आता कामाचे नाही. मी ते अरबी समुद्रात टाकणार आहे, असे सांगतानाच आता कोणी विरोधी पक्षच राहिला नाही. हे विरोधकांना आपल्यात घेत आहेत म्हणजे नक्की काय आहे? कुठे आहे लोकशाही आणि लोकांनी नक्की काय करायचे? सामान्य नागरिकांनी एकत्रित येऊन या लोकांना धडा शिकवला पाहिजे, असे आवाहनही दमानिया यांनी केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर