सांगली, ३ सप्टेंबर २०२० : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर ४३ कोटी रुपयांच्या सोने तस्करी संदर्भात महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील विविध ठिकाणी सीमाशुल्क, केंद्रिय जीएसटी पथकाने छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली.
तीन दिवसापूर्वी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून आठ जणांनी ४३ कोटी रुपयांची सोन्याची ५०४ बिस्किटे महसूल गुप्तचर अधिकाऱ्यांनी जप्त केली. २९ ऑगस्ट रोजी दिब्रुगड – नवी दिल्ली या राजधानी एक्सप्रेसने हे सर्व संशयित दिल्लीत पोहोचले. त्यावेळी त्यांना पकडण्यात आले.
हे सर्वजण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातले आहेत असं तपासात निष्पन्न झालं. त्यानंतर गेली दोन दिवस सीमा शुल्क विभाग आणि केंद्रीय जीएसटी पथकाने आटपाडी भागात एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकले. संशयितांनी म्यानमार येथून मणिपूरच्या सीमेवरून या सोन्याची तस्करी केल्याची माहिती उघडकीस आली.
या गुन्ह्याच्या तपासातून सोने तस्करीची मोठी टोळी उघडकीस येईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र त्यांनी याबाबतचा तपशील देण्यास नकार दिला
न्यूज अनकट प्रतिनिधी