दिल्ली विमानतळावर कस्टमची जप्तीची कारवाई; २८ कोटी रुपयांची मनगटी घड्याळे जप्त

नवी दिल्ली, ६ ऑक्टोबर २०२२: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (IGI विमानतळ) विमानतळ सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी एका भारतीय प्रवाशाकडून २८ कोटी रुपयांची ७ अत्यंत मौल्यवान घड्याळांची तस्करी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली विमानतळ कस्टम्स अधिकाऱ्याने एका प्रवाशाकडून ७ रोलेक्स घड्याळे, एक हिरे जडीत सोन्याचे ब्रेसलेट आणि आयफोन १४ प्रो जप्त केले आहे. या सर्वांची किंमत साधारण २८ कोटी रुपयांच्या आसपास आहे. संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, जप्त करण्यात आलेले एक घड्याळ हे सोन्याचे असून ते हिरे जडीत आहे. त्याची किंमत २७ कोटी ९ लाख, २६ हजार, ५१ रुपये इतकी आहे. त्याचबरोबर एकूण जप्त केलेल्या मालाची किंमत २८ कोटी १७ लाख ९७ हजार ८६४ रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

आरोपी भारतीय असून, दुबईहून येत होता

सीमाशुल्क अधिकार्‍यांनी तस्करीच्या आरोपीची ओळख सार्वजनिक केलेली नसून संबंधित आरोपी भारतीय नागरिक असल्याचे सांगितले आहे. तो दुबईहून भारतात परतला होता या दरम्यान एका माहितीच्या आधारे त्याच्या सामानाची झडती घेण्यात आली, ज्यामध्ये ही मनगटी घड्याळ सापडली असून आरोपीला त्यांची कागदपत्रे सादर करता आली नसल्याचे अधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.

एपीआयएस प्रोफाइलिंगच्या आधारे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या वस्तू सीमाशुल्क कायदा, १९६२ च्या कलम ११० अंतर्गत जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच प्रवाशाला सीमा शुल्क कायदा, १९६२ च्या कलम १०४ अंतर्गत अटक करण्यात आली आहे, कारण त्याने केलेला गुन्हा कलम १३५ अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा