वर्धा १६, जून २०२३ : वर्ध्यामधील वर्धा नागरी सहकारी बँकेचे अकाऊंट हॅक केल्याच्या घटनेची उकल करण्यात पोलिसांना यश आले. येस बँकेची युटिलिटी हॅक करुन, बँकेत असलेल्या वर्धा नागरी सहकारी अधिकोष बँकेच्या खात्यातून एक कोटी एकवीस लाख सोळा हजार रुपये लंपास झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी एका नायजेरियन नागरिकासह पाच आरोपींना अटक केली. यामधिल नायजेरियन नागरिक या हॅक प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची शक्यता आहे.
येस बँकेत वर्धा नागरी बँकेचे खाते आहे, त्या खात्यातून आरटीजीएस आणि एनईएफटी व्यवहार केले जातात. २४ मे रोजी बुधवारी बँक बंद असताना, पहाटे सहा ते सकाळी आठ या वेळेत, येस बँकेची युटिलीटी सायबर चोरट्यांनी हॅक करुन सायबर हल्ला केला होता. यामध्ये वर्धा नागरी बँकेच्या खात्यातून तब्बल एक कोटी एकवीस लाख सोळा हजारांची रक्कम विविध खात्यात वळती झाली होती. सकाळी बँक उघडल्यावर सर्व कॉम्प्युटर सुरु करुन तपासणी केली असता कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात आली. या प्रकरणी वर्धा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन सायबर सेलकडून पुढील तपास करण्यात येत होता.
या प्रकरणाच्या तपासासाठी आरबीआयची एक टीम पाच दिवस वर्ध्यात होती. वर्धा पोलिसांची पाच पथके बनवण्यात आली होती. यातील एक पथक वर्ध्यात, एक पथक बंगळुरु, एक मुंबई, एक दिल्ली आणि एक पथक हैदराबादला तपास करत होते. वेगवेगळ्या टीमने शर्थीने काम केले. त्यानंतर येस बँकेच्या सर्व्हरचा आयपी अॅड्रेस हॅक करणारा बंगळुरुमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बंगळुरू येथून एका नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले तर दिल्ली येथून दोन आणि मुंबई येथून दोन अशा पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात नायजेरियन नागरिक मुख्य सूत्रधार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आरोपींनी ही रक्कम वेगवेगळ्या ५० ते ६० खात्यामध्ये ट्रान्सफर केली होती. मणिपूर, मिझोरम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, सिक्कीम, तेलंगाणा, आसाम, त्रिपुरा, उत्तरप्रदेश आदी ठिकाणच्या सुमारे २५ बँकांच्या एटीएममधून पैसे काढले. दरम्यान पोलिसांनी २३ लाख १० हजार रुपये खात्यात थांबवले असून इतर जवळपास ६० खाती गोठविण्यात आली आहेत. आरोपींकडून १६ एटीएम,९ मोबाईलसह, इतर साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी वर्धा पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर