बिपरजॉय वादळाचा गुजरातला जोरदार तडाखा, सर्वच व्यवसाय ठप्प, हजारो कोटींचे नुकसान

नवी दिल्ली १६ जून २०२३ : बिपरजॉय चक्रीवादळाने देशाच्या पश्चिम किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला. या वादळाच्या नुकसानीचे आकडे चक्रावून टाकणारे आहेत. बंदर, रेल्वे आणि विमानसेवा प्रभावित झाली तर छोटे-मोठे अनेक व्यवसाय ठप्प झाले. पत्रसूचना कार्यालयाने दिलेले आकडे अधिकच धक्कादायक आहेत. गुजरातमधील ८९००० घरे आणि झोपड्यांची पडझड झाली असुन ८६०० हुन अधिक गुरंढोरे मरण पावली. सुमारे दीड लाख हेक्टरवरील पीके त्यासोबतच मच्छिमारांच्या ४७५ नावा नष्ट झाल्या आहेत. केंद्र सरकारकडे गुजरात सरकारने ९८०० कोटी रुपयांहून अधिकची मदत मागितली आहे.

बिपरजॉयमुळे सुमारे १०० रेल्वे गाड्या रद्द झाल्या तर जामनगर एअरपोर्टवरील विमानसेवा आणि मीठागरेसुद्धा बंद करण्यात आली आहेत. किनारपट्टीलगत असणारे ३५० मोठे तर लघु-मध्यम स्वरूपाचे ६७०० कारखाने,उद्योग बंद करण्यात आले आहेत. हजारो हॉटेल्स, किराणा दुकान, रस्त्यावरील व्यावसायिक यांच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. दोनच दिवसातील अंदाजानुसार ५०० ते १००० कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाची गती अधिक असल्याने किनारपट्टी भागातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मच्छिमारांच्या नावा, मोठी जहाज किनारपट्टीवर नांगर टाकून उभी करण्यात आली आहेत. हा परिसर निर्मनुष्य करण्यात आला असून या भागातील सर्व व्यवहार, दळणवळण थांबविण्यात आले आहे. त्यामुळे किनारपट्टीवर शुकशुकाट पसरला आहे.गुजरातमधील प्रमुख व्यवसाय हा मीठ तयार करण्याचा आहे. गुजरातमध्ये दररोज वीस लाख टनांहून अधिक मीठ तयार करण्यात येते. भारतात सर्वत्र गुजरात राज्यातूनच मीठाचा पुरवठा होतो. पण चक्रीवादळाने मीठ निर्मिती कारखाने बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांच्या उदरर्निवाहचा प्रश्न उभा राहिला आहे.

जगातील सर्वात मोठया ऑईल रिफायनरीला या वादळाचा फटका बसला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने या नैसर्गिक संकटामुळे गुजरातमधील सिक्का बंदरातून डिझेल आणि इतर तेल उत्पादनांचे दळणवळण थांबविले आहे. येथे दररोज ७,०४,००० बॅरल तेल आणि तेलजन्य पदार्थांचे उत्पादन करुन ते युरोपमध्ये पाठवले जाते. युरोपमध्ये याच बंदरातून डिझेलची निर्यात करण्यात येते. परंतु आता ही ऑईल रिफायनरी पण प्रभावित झाली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा