दादा सोनमाळी यांनी कर्जतचे प्रांत अधिकारी अर्चना नष्टे यांच्या कामकाजाविषयी केले प्रश्न उपस्थित

कर्जत, १३ ऑगस्ट २०२०: कर्जत उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांना आदर्श उपजिल्हाधिकारी पुरस्कार मिळाल्यानंतर कर्जतचे माजी उपसरपंच, दादा सोनमाळी यांनी गंभीर आरोप करत या पुरस्काराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

कर्जत तालुक्याच्या प्रांत अधिकारी यांना आदर्श उपजिल्हाधिकारी पुरस्कार मिळण्यासारखे यांनी काय काम केले? असा प्रश्न उपस्थित करत, कर्जत महसूल विभागाची जिल्ह्यात सर्वात जास्त दयनीय अवस्था आहे. या अगोदरच्या प्रांताधिकारी यांनी येथे आपली वेगळी छाप निर्माण केलेली असून या प्रांताधिकारी आल्यापासून फक्त वाळू व्यवसायाची प्रगती झाल्याचे दिसत आहे. कर्जत तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या भीमा, सीना नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असताना कोणत्याही कारवाया केल्या जात नाहीत. वाळू उपसा प्रांताधिकारी यांच्या आशीर्वादाने होत असल्याचा स्पष्ट आरोप यावेळी सोनमाळी यांनी केला.

भीमा व सीना या दोन्ही नद्यांमधून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून नुकतेच रातंजन मध्ये दोन युवकांचा सीना नदीत मृत्यू झाला. वाळू उपशामुळे तयार झालेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्यानेच हे मृत्यू झाले असून, कर्जतच्या प्रांंताधिकारी नदीच्या भोवती फिरताना दिसतात मात्र कारवाया केल्याचे दिसत नाही. वाळू उपसा तर मोठ्या प्रमाणात जोरात सुरू आहे. कार्यालयातील केसेस मध्ये बाहेरच्या माणसाचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असून या केसेस मध्ये काय करायचे हे बाहेरचे लोकच ठरवितात. तलाठ्याच्या नियुक्त्यांमध्ये ही तालुक्यातील एका टोकाचे गाव असलेल्या तलाठ्याकडे दुसऱ्या टोकाचे गाव दिले जात आहे. कोणताही मेळ या नियुक्त्यांमध्ये दिसत नाही.

या प्रांंताधिकारी यांनी आपल्या कार्यकाळात कोणतेही वेगळे व आपला ठसा उमटविणारे काम केलेले नाही. रेशन दुकानापुढे रांगा लागत असताना यांनी कधी रेशन दुकानांना भेटी दिल्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित करताना कोणतेही प्रभावी काम केलेले नसताना यांना आदर्श पुरस्कार कसा मिळतो? असा प्रश्न उपस्थित करतानाच यापेक्षा वाईट अवस्था अशी की काही राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती पुरस्कार मिळाला की लगेच जवळीक साधण्यासाठी हार घालायला पुढे येत आहेत. मात्र त्या व्यक्तीचे काम खरोखर कसे आहे? हे कोणी पाहत नाही. ज्याच्या बदलीची मागणी आपण करायला पाहिजे त्याचा आपण सत्कार करू लागलो तर कार्यकर्त्यांचा अंकुश या अधिकाऱ्यावर राहणार नाही. अनेक शासकीय कामांचा उल्लेख करत सोनमाळी यांनी या कामाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. तर प्रांत कार्यालयातील कर्मचारीही खाजगीमध्ये कार्यालयाची अत्यंत वाईट अवस्था झाली ,असल्याचे म्हटले आहे. अधिकाऱ्यांच्या जवळ जाऊन आपल्या भागाचा विकास होणार नाही असे म्हणत अशा प्रांत अधिकाऱ्यांची तातडीने बदली करण्यात यावी अशी मागणी करत याकडे लोकप्रतिनिधीनी लक्ष घालावे असे आवाहन ही दादा सोनमाळी यांनी केले आहे.

प्रांंताधिकारी यांच्यावर सोनमाळी यांनी गंभीर आरोप केल्यानंतर याबाबत प्रांंताधिकारी अर्चना नष्टे यांना प्रतिक्रिया विचारली असता संबंधित व्यक्तींनी केलेले सर्व आरोप निराधार असून तलाठ्यांच्या नियुक्त्या या गावच्या प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेऊन केलेल्या असतात, गौण खनिजबाबत आपण स्वतः तहसीलदार व त्या त्या ठिकाणचे मंडल अधिकारी, तलाठी यांच्या समन्वयातून सातत्याने कारवाया केलेल्या आहेत. केसेस मधील बाहेरच्या व्यक्तींचा हस्तक्षेपाचा आरोप चुकीचा असून असे काहीही नाही, असे म्हणत असे काहीही असेल तर संबंधितांनी समक्ष उपस्थित राहून लेखी अथवा तोंडी तक्रारी पुराव्यासह सादर कराव्यात त्याबाबत मी त्याची दखल घेईल असे म्हटले.

प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांना महसूल दिनानिमित्त जिल्ह्यातील उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून अनेक राजकीय पक्षाच्या व्यक्ती, सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला आहे. या पार्श्वभूमीवर दादासाहेब सोनमाळी यांनी केलेल्या आरोपाने कर्जत उपविभागात खळबळ माजली असून याकडे लोकप्रतिनिधी कसे पाहतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोनमाळी हे खासदार सुजय विखे यांचे कट्टर समर्थक असून या विषयात खा. विखे कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा