Coconut Price Hike: नारळाचे दर सध्या गगनाला भिडले असून, गेल्या महिनाभरात तब्बल १०० रुपयांची विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. कधी काळी सहज परवडणारा नारळ आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागला आहे. यंदाच्या हंगामातील उत्पादनात झालेली लक्षणीय घट, बदललेले हवामान, व्यापाऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने केलेला प्रचंड साठा आणि सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी यामुळे ही दरवाढ झाली आहे. येत्या काळातही दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे, ज्यामुळे गृहिणी आणि व्यावसायिकांच्या चिंता वाढल्या आहेत.
या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांपासून ते हॉटेल;
व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाच बसला आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये नारळाला विशेष महत्त्व असल्याने, आता या कार्यक्रमांचा खर्च वाढला आहे. अनेक हॉटेल व्यावसायिकांनी भाज्यांमध्ये खोबऱ्याचा वापर कमी केला आहे, तर पोहे विक्रेत्यांनी तर ग्राहकांना पोह्यासोबत खोबरे देणेच बंद केले आहे. ही परिस्थिती नारळाच्या वाढत्या किमतीची दाहकता स्पष्टपणे दाखवते.
भारतात कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधून नारळाचा मुख्य पुरवठा होतो. याव्यतिरिक्त श्रीलंका, फिलिपाइन्स आणि इंडोनेशियासारख्या देशांमधूनही नारळाची आयात केली जाते. मात्र, सध्या श्रीलंकेतून होणारी आयात थांबली असून, देशांतर्गत पुरवठ्यातही मोठी घट झाली आहे. जानेवारीमध्ये १८५ रुपये किलो असलेला खोबऱ्याचा दर जून अखेरीस ३५० रुपयांवर पोहोचला आहे. या अनपेक्षित आणि मोठ्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. नारळाच्या दरातील ही वाढ पाहता, सणासुदीच्या काळात आणि दैनंदिन वापरात नागरिकांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागणार आहे. यावर सरकार आणि संबंधित यंत्रणा काय उपाययोजना करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे
