लोणीभापकर (बारामती), ११ ऑक्टोंबर २०२०: बारामती तालुक्यात मागील तीन दिवसांपासून पावसानं लोणीभापकर (ता. बारामती) व आसपासच्या परिसरात प्रचंड धुमाकूळ घातला आहे. या सततच्या पावसानं शेतकाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
तालुक्यात कोसळणाऱ्या संततधार पावसानं कांद्यासह, भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. कांद्याच्या पिकाची चांगली वाढ झाल्यानं कांदा काढण्यास आला होता. मात्र, पावसानं शेतात चिखलात काम करता येत नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
लोणीभापकर, पळशी, मासाळवाडी, मोराळे, कानडवाडी या परिसरातील शेतकऱ्यांनी कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलेलं आहे. सर्वदूर सातत्यानं कोसळलेल्या पावसानं सर्वत्र थैमान घातलं आहे. पावसाचं पाणी शेत शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात साचल्यानं कांद्याचं पीक तसेच ज्वारीचं पीक जळू लागली आहेत. या पावसानं शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. त्यामुळं शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव