नवी दिल्ली, 27 एप्रिल 2022: भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूची प्रकरणे (COVID Review Meeting) वेगानं वाढत आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावलीय. या बैठकीत पंतप्रधान मोदी देशभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. वेळापत्रकानुसार पीएम मोदींची ही बैठक दुपारी 12 वाजता सुरू होईल.
कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबतची ही पहिलीच बैठक आहे. याआधीही वेळोवेळी पीएम मोदी कोरोनाच्या परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत.
बुधवारी होणाऱ्या या बैठकीत पंतप्रधान मोदींसह पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारीही सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि त्यांच्या मंत्रालयाशी संबंधित अधिकारीही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत देशभरात कोरोनाचा बूस्टर डोस मोफत देण्याचा प्रस्तावही जारी केला जाऊ शकतो, असं मानलं जात आहे.
याआधी रविवारी, पंतप्रधान मोदींनी देशवासियांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आणि कोविड संसर्गाची प्रकरणं पाहता मास्क घालणं, योग्य अंतर पाळणं आणि वारंवार हात धुणं यासारख्या सर्व प्रतिबंधात्मक उपायांचं पालन करावं.
राजेश भूषण सादरीकरण देऊ शकतात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी म्हणाले की, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण या प्रकरणी सादरीकरण करतील. दिल्लीत कोरोनाने जोर पकडला आहे. देशात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे.
दिल्लीत 24 तासांत कोरोनाचे 1200 हून अधिक रुग्ण
देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचा वेग झपाट्याने वाढत असताना पंतप्रधान मोदींनी ही बैठक बोलावली आहे. येथे, गेल्या 24 तासांत 1200 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गेल्या 10 दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर दिल्लीत संसर्ग कसा वाढत चालला आहे हे कळते. दिल्लीत 10 दिवसांपूर्वी म्हणजेच 16 एप्रिलच्या कोरोनाच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, एका दिवसात कोरोनाचे एकूण 461 रुग्ण आढळून आले. तसेच दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
मुलांची लस मंजूर
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI ने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला 6 ते 12 वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिलीय. याशिवाय, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी तातडीच्या वापरासाठी Zydus Cadila च्या Zycov D लस देखील मंजूर करण्यात आलीय. औषध नियंत्रक जनरल ऑफ इंडिया (DCGI) च्या विषय तज्ञ समितीच्या (SEC) बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये 2-12 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या वापरासाठी डेटा मागवण्यात आला होता.
अमेरिकेचे उपाध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह
देशासोबतच जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस याही कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यांच्या कार्यालयानुसार, हॅरिसमध्ये कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यांनी स्वतःला आइसोलेट केलंय. सरकारी निवासस्थानातूनच त्या त्यांची कामं करणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे