डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला तडाखा, हैदराबादचा दणदणीत विजय

दुबई, २८ ऑक्टोबर २०२०: सनराजयर्स हैदराबादने दिल्ली कॅपिट्लसवर ८८ धावांनी शानदार विजय मिळवला आहे. तर दिल्लीचा हा या मोसमातील सलग तिसरा पराभव ठरला. वॉर्नर-साहा जोडीने केलेली झंझावाती अर्धशतके आणि मनिष पांडेने मोक्याच्या क्षणी केलेली तडाखेबाज खेळी याच्या बळावर हैदराबादने २० षटकात २१९ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र, हैदराबादच्या गोलंदाजांसमोर दिल्लीचा डाव १९ ओव्हरमध्येच आटोपला. दिल्लीचा संघ १३१ धावांवर गारद झाला. कर्णधार बर्थडे बॉय डेव्हिड वॉर्नर आणि ऋद्धीमान साहा हे दोघे हैदराबादच्या विजयाचे हिरो ठरले.

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा जोडीने तुफान फटकेबाजी करत पॉवरप्लेमधील यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम धावसंख्या गाठली. वॉर्नर-साहा या जोडीने पावर प्लेच्या पहिल्या ६ ओव्हरमध्ये तडाखेबाज ७७ धावा केल्या. यासह या जोडीने आयपीएलच्या १३ व्या मोसमात पावर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. डेव्हिड वॉर्नरने पॉवर-प्लेमध्येच आपले अर्धशतक पूर्ण केले. तो ३४ चेंडूत १९४.१२ च्या स्ट्राईक रेटने ८ फोर आणि २ सिक्सच्या मदतीने तडाखेदार ६६ धावा करून माघारी परतला. वृद्धिमान साहाने मात्र फटकेबाजी सुरूच ठेवली. पण शतकाने त्याला हुलकावणी दिली. त्याने ४५ चेंडूत १९३.३३ च्या स्ट्राईक रेटने १२ फोर आणि २ सिक्सच्या मदतीने ८७ धावा केल्या.

त्यानंतर मनिष पांडे आणि केन विलीयमसन जोडीने शेवटपर्यंत खिंड लढवली. मनिष पांडेने ३१ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या. तर विल्यमसनने नाबाद ११ धावा केल्या. या दोघांनी संघाला २० षटकात २१९ धावांपर्यंत मजल मारून दिली.

दरम्यान या विजयासह हैदराबादचा या मोसमातील हा ५ वा विजय ठरला. ताज्या आकडेवारीनुसार हैदराबाद पॉइंट्सटेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. हैदराबाद आपले आगामी सामने ३१ ऑक्टोबरला बंगळुरुविरुद्ध आणि ३ नोव्हेंबरला मुंबईविरुद्ध खेळणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा