वॉशिंगटन, २२ ऑक्टोबर २०२२: जर तुमचे नातेवाईक मृत पावले तर त्यांना परत जिवंत करता येईल.. असा विचार कायम मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईंकांच्या मनात येत असतो. तसं होऊ पण शकतं. असे संशोधन सुरु झाले आहे. अमेरिकेतल्या अॅरिझोना शहरातल्या एका कंपनीनं अशा मृत व्यक्तींचं शव जतन करून ठेवलं आहे, की ज्यांच्या नातेवाईकांना ते पुन्हा एक दिवस जिवंत होतील, अशी आशा आहे. अमेरिकेतल्या अल्कोर लाइफ एक्स्टेंशन फाउंडेशनने द्रवरूप नायट्रोजनने भरलेल्या टाक्यांमध्ये सुमारे २०० मानवी शरीरं क्रायोप्रिझर्व्ड केली आहेत. या व्यक्ती भविष्यात पुन्हा जिवंत होण्याची अपेक्षा आहे. फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, अनेक असे रुग्ण आहेत जे कॅन्सर, एएलएस किंवा इतर आजारांनी ग्रस्त होते, ज्यावर सध्या कोणताही इलाज उपलब्ध नाही. भविष्यात वैद्यकीय तंत्रज्ञानासह आरोग्य मिळण्याच्या उद्देशाने सबफ्रीजिंग तापमानाचा वापर करून मृत्यूची प्रक्रिया थांबवून जीव वाचवण्यासाठी केलेला एक अभ्यास म्हणजे क्रायोनिक्स होय. मृत्यूची प्रक्रिया थांबवण्यासाठी क्रायोनिक्स हा सर्वोत्तम मार्गांपैकी एक असल्याचं या संस्थेचं म्हणणं आहे. ज्यामुळे मृत व्यक्ती पुन्हा जिवंत होण्याची आशा निर्माण होऊ शकते.
क्रायोनिक्स संस्थेचे अध्यक्ष मूर यांनी सांगितलं की, क्रायोनिक्सचा आपत्कालीन उपचार म्हणून विचार केला जातोय. रुग्णाची केवळ विल्हेवाट लावण्यापेक्षा त्याला आमच्याकडे सोपवा, असं आम्ही सांगत आहोत. भविष्यात त्यांना पुन्हा जिवंत करण्याचं तंत्रज्ञान विकसित होईल, तोपर्यंत ही कंपनी त्यांचं शरीर खराब होण्यापासून वाचवेल.
भविष्यात जेव्हा या व्यक्ती पुन्हा जिवंत होतील तेव्हा त्या आपले नातेवाईक आणि मित्रांना भेटू शकतील, असं कंपनीला वाटतं. भविष्यात विज्ञान माणसांना पुन्हा जिवंत करेल, असे शास्त्र प्रगत होईल या आशेवर क्रायोनिक्स टिकून आहे. एक शरीर जतन करण्यासाठी किमान दोन लाख डॉलर्स मोजावे लागणार आहेत. एका मेंदूसाठी ऐंशी हजार डॉलर खर्च येतो. त्यामुळे हा उपाय नक्कीच खर्चिक आहे, पण त्यामुळे तुमची व्यक्ती तुमच्या जवळ राहिल हे नक्की.
न्यूज अनकट प्रतिनिधी –तृप्ती पारसनीस