रात्रभर दारू विक्री करणाऱ्या युवकाचा मृत्यू

पुणे, दि.६ मे २०२० : येरवडा परिसरातील ‘हॉटस्पॉट’ कार्य क्षेत्रात रात्रभर दारू विक्री करणाऱ्या युवकाचा सोमवार (दि.४) रोजी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला.

या घटनेने पोलिसांसह येरवडा क्षेत्रीय अधिकाऱ्यांना धक्का बसला असून या कोरोनाबाधित युवकाने किती जणांना दारू विक्री केली याची माहिती मिळणे अवघड झालं आहे. युवकांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील सर्वांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पर्णकुटी पोलिस चौकीच्या हद्दीत हॉटस्पॉटच्या ठिकाणी राहत असलेला एक युवक रात्रभर गावठी व विदेशी दारू, ताडी विक्री करण्याचे काम करत होता.मात्र त्याला काही दिवसांपूर्वी कोराेनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते.

मात्र सोमवारी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर मात्र येरवडा पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांची चांगली धावपळ सुरू झाली. मात्र संबंधित युवकाला कोणामुळे कोरोना झाला? त्यानंतर त्याचा किती जणांशी संपर्क आला हे सांगणे कठीण असल्यामुळे तो राहत असलेल्या वस्तीतील रहिवासी भयभीत झाले आहेत.

महापालिकेच्या “डॉक्टर आपल्या दारी” या उपक्रमात या युवकाने आरोग्य तपासणी केली होती. त्यानंतर त्याला कोरोना संशयीत म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र उपचारा दरम्यान त्याचा सोमवारी मृत्यू झाला.” अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. माया लोहार यांनी दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा