मुंबई, १४ जानेवारी २०२३ : दादर येथील प्रसिद्ध असलेल्या शारदाश्रम इंटरनॅशनल शाळेमध्ये एका विद्यार्थिनीला फी न भरल्याने चक्क परीक्षेपासून तिची अडवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पालकांकडून दादर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षिका यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी शाळेकडून तसा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
फी भरली नाही म्हणून दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला परीक्षा देण्यापासून अडविण्यात आले, असा आरोप विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे; तसेच या विद्यार्थिनीला एका खोलीत कोंडून ठेवल्याचे पालकांनी तक्रारीत म्हटले आहे. पालकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी शारदाश्रम इंटरनॅशनल शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षिका यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तर शाळेकडून असे सांगण्यात आले आहे, की असे काहीही घडलेले नसून सीसीटीव्ही फुटेज आम्ही पोलिसांना दिले आहेत. पालकांची तक्रार चुकीची आहे. विद्यार्थिनी पहिल्या इयत्तेत शिकत असल्यापासून पालक नियमितपणे फी भरत नाहीत. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी-पालक-शिक्षक महासंघाचे सभासद नितीन दळवी यांनी राज्य बालहक्क आयोग विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे देखील शाळेविरोधात तक्रार केली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर