सरकारी बैठकीनंतर निर्णय, खाद्यतेल होणार इतके स्वस्त!

8

नवी दिल्ली, ८ ऑगस्ट २०२२: महागाईने हैराण झालेल्या जनतेला येत्या काही दिवसांत दिलासा मिळणार आहे. येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किरकोळ किमतीत घसरण होण्याची शक्यता आहे. खाद्य तेल प्रोसेसर आणि उत्पादकांनी अन्न आणि ग्राहक मंत्रालयासोबत झालेल्या बैठकीनंतर तेलाच्या किमती कमी करण्याचं मान्य केलंय. परदेशी बाजारात खाद्यतेलाच्या किमती घसरल्यानंतर देशांतर्गत किमतीत कपात केली जाऊ शकते. घसरलेल्या किमतींचा लाभ घरगुती ग्राहकांनाही मिळावा, असा सरकारचा प्रयत्न आहे.

१० ते १२ रुपये स्वस्त होऊ शकतं

वृत्तानुसार, जागतिक बाजारपेठेत किमती नरमल्यानंतर देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यास तेल उत्पादकांनी सहमती दर्शवलीय. येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किरकोळ किमती १०-१२ रुपयांनी कमी होऊ शकतात. मात्र, गेल्या महिन्यातही तेल उत्पादक कंपन्यांनी दरात कपात केली होती. परंतु मंत्रालयाचं असं मत आहे की, जागतिक किमतीत घसरण झाल्यानंतर अजूनही किमती आणखी कमी होण्यास वाव आहे.

गेल्या महिन्यात कमी झाल्या होत्या किमती

जुलैमध्ये खाद्यपदार्थ उत्पादक कंपनी अदानी विल्मरने खाद्यतेलाच्या किमतीत प्रति लिटर ३० रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अदानी विल्मरने एका निवेदनात म्हटलं होतं की, जागतिक किमतीतील घसरण लक्षात घेऊन कंपनीने कमी दरात खाद्यतेल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही कपात केली आहे.

यामुळं परदेशी बाजारात भाव वाढले होते

भारत आपल्या स्वयंपाकाच्या तेलाच्या दोन तृतीयांश आयात करतो. अलिकडच्या काही महिन्यांत, रशिया-युक्रेन युद्ध आणि इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळे खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, अलीकडच्या काही महिन्यांत इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी उठवलीय. त्यामुळं जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या आहेत.

किंमती आणि उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी केंद्राने मे महिन्यापासून तेल निर्मात्यांसोबत तीन बैठका घेतल्या आहेत. भारत पाम तेलाच्या आयातीसाठी इंडोनेशिया आणि मलेशिया आणि सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेलासाठी युक्रेन, अर्जेंटिना, ब्राझील आणि रशियावर अवलंबून आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा