नवी दिल्ली, 14 मार्च 2022: रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, भारत सरकारने युक्रेनमधील भारतीय दूतावास तात्पुरते पोलंडमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनच्या पश्चिम भागातील बिघडलेली परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. यापूर्वी, 1 मार्च रोजी, दूतावास कीवमधून लिव्हमध्ये हलवण्यात आला होता. आतापर्यंत दूतावास येथूनच चालत होता.
मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक
याआधी रविवारी युक्रेन-रशिया युद्धाची परिस्थिती पाहता पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये भारताच्या सुरक्षा सज्जतेचा आढावा घेण्यात आला. तसेच सध्याच्या जागतिक परिस्थितीवर चर्चा केली. यावेळी, खार्किवमध्ये मारल्या गेलेल्या भारतीय नवीन शेखरप्पा यांचे पार्थिव आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले.
या बैठकीत पंतप्रधानांनी संरक्षण यंत्रणेत वापरल्या जाणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. यादरम्यान पंतप्रधानांनी विचारले की, विदेशी वस्तू कोणत्या मशिनरीमध्ये वापरल्या जातात? त्याचवेळी, सर्व उपकरणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जोडली जावीत आणि जास्तीत जास्त तंत्रज्ञान मेक इन इंडियाचे असावे यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश पंतप्रधानांनी बैठकीत दिले.
बैठकीत पंतप्रधानांनी ऑपरेशन गंगाचाही आढावा घेतला. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमन, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, एनएसए अजित डोवाल आणि परराष्ट्र व्यवहार आणि अर्थमंत्र्यांचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुखही उच्चस्तरीय बैठकीला उपस्थित होते.
17,000 हून अधिक लोकांना भारतात आणण्यात यश
ऑपरेशन गंगा दरम्यान, भारताने आतापर्यंत युक्रेनमधून 17,000 हून अधिक लोकांची सुटका केली आहे. यासोबतच नेपाळ आणि बांगलादेशातील काही लोकांची सुटका करून त्यांना युक्रेनमधून आणण्यात आले. ऑपरेशन गंगा यशस्वी करण्यासाठी सरकारने आपले चार मंत्री युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या देशांमध्ये पाठवले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे