दीड एकरातील कोथिंबीरीने शेतकऱ्याला बनवले लखपती

पुरंदर देि.२ जून २०२०: पुरंदर तालुक्यातील वीर येथील एका शेतकऱ्याला कोथिंबिरीच्या पिकातून चक्क सव्वा तीन लाख रुपयांचे उत्पादन मिळाले. येथील सोमेश्वर कारखान्याच्या संचालिका ऋतुजा राजेंद्र धुमाळ यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये कोथिंबीरीचे पीक केले होते. एकीकडे शेतकऱ्याचा शेतमाल विकला जात नसताना धुमाळ यांना मात्र कोथिंबिरीच्या पिकातून भरघोस उत्पन्न मिळाला आहे
गेल्या तीन महिन्यापासून तरकारी पिकामध्ये मध्ये शेतकरी बुडाला आहे. मात्र गेल्या आठवड्यापासून कोथिंबीरीला मिळणारे दर आश्चर्यचकित करणारे आहेत. आज पुरंदर तालुक्यातील वीर येथील शेतकरी ऋतुजा राजेंद्र धुमाळ यांच्या दीड एकर कोथिंबीरीला ३ लाख २५ हजार रुपये दर मिळाला. जानेवारी महिन्यापासून शेतकऱ्याच्या कोणत्याही भाजीपाला पिकाला दर मिळाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.

अनेकांनी आपले उभे पीक सोडून दिले, तर अनेकांनी पिकाची लागणच केली नाही. त्यामुळे आता बाजारामध्ये तरकारी पिकांचा पुरवठा मर्यादित झाला आहे. त्यामध्ये सर्वात जास्त मागणी असणाऱ्या कोथिंबिरीला आता मागणी वाढते आहे. मात्र पुरवठा खूपच कमी झाल्याने बाजारही वाढत आहेत. कोथंबीरीला बाजार वाढल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

याबाबत बोलताना ऋतुजा धुमाळ म्हणाल्या की, आम्ही दीड एकरात महिन्यापूर्वी कोथिंबीर केली होती. यासाठी मला जवळपास ५० हजार रुपये खर्च आला आहे. कोथिंबीरीला एवढा चांगला बाजार मिळेल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. उलट ही कोथिंबीर खपेल का नाही याबद्दल आम्हाला चिंता होती. मात्र आता चांगला बाजार भाव आम्हाला मिळत आहे . त्यामुळे आता आम्ही आनंदी आहोत.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा