आयुध निर्माणी कारखान्यांच्या महामंडळास कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध देशव्यापी संपाचा इशारा

केंद्र सरकारच्या देहूरोड आणि खडकी येथील आयुध निर्माणी कारखान्यांचे महामंडळात रूपांतर करण्याच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला कामगार संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. याविरोधात विविध कामगार संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त कृती समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या माध्यमातून ९ ऑक्टोबरपर्यंत स्वाक्षरी अभियान राबवले जात आहे. १ ऑक्टोबरला ‘महामंडळ करण्याविरोधी दिवस’ साजरा करून, प्रसार भारतीच्या धर्तीवर खासगीकरण होऊ नये, अशी मागणी जोर धरत आहे.

एक हजार सातशे कामगार आंदोलनात

इंटक, ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉइज फेडरेशन आणि भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ यासारख्या प्रमुख कामगार संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. देहूरोड येथील ७०० अधिकारी आणि कामगार, तर खडकीतील १००० कामगार या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. कर्मचाऱ्यांनी “आम्ही सरकारी कर्मचारीच राहणार आणि सरकारी कर्मचारी म्हणूनच निवृत्त होणार” अशी ठाम भूमिका घेतली आहे.

देशव्यापी आंदोलनाची तयारी

भारतीय संरक्षण कामगार संघाचे सरचिटणीस अशोक थोरात यांनी स्पष्ट केले की, गरज पडल्यास देशव्यापी आंदोलन पुकारण्यात येईल. त्याचप्रमाणे, ऑर्डनन्स फॅक्टरी वर्कर्स युनियनचे उपाध्यक्ष प्रसाद कातकडे यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून ४१ दारूगोळा कारखान्यांच्या महामंडळीकरणाविरोधात कायदेशीर आणि आंदोलनात्मक लढा सुरू आहे. कामगार संघटनांच्या या आक्रमक भूमिकेमुळे केंद्र सरकारपुढील आव्हान वाढले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे