गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबाचे राजकारणातील अस्तित्व संपवण्यासाठी दिल्लीतू प्रयत्न – संजय राऊत

मुंबई, १ जून २०२३ : भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना भाजप माझा पक्ष आहे. पण मी भाजपची थोडीच आहे, असे विधान केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोरच पंकजा मुंडे यंनी हे विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पंकजा यांच्या या विधानाचे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पंकजा यांनी जाणूनबुजून हे विधान केलं का? त्या वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत काय ? पक्षात त्यांचं खच्चीकरण सुरू आहे काय ? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे. अशातच भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनावर बोलताना, भाजपचा कोणीही नेता त्यांच्या भेटीला गेला नाही हे विधान करून भाजपला घरचा आहेर दिला आहे. आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा आरोप केला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबाचे राजकारणात अस्तित्व राहु नये म्हणून दिल्ली आणि महाराष्ट्रात प्रयत्न सुरू आहेत.

संजय राऊत यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना हा आरोप केला आहे. पंकजा मुंडे या भाजपमध्ये आहेत. पण भाजप त्यांना आपले मानत नाही. असे त्यांना सांगायचे आहे. गोपीनाथ मुंडे यांनी भाजप उभा करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन रक्ताचे पाणी केले. भाजपला आजचे दिवस गोपीनाथ मुंडे यांनी दाखवले. त्यांच्यासोबत बहुजन समाजातील नेते होते. बहुजन समाजातील या नेत्यांनी भाजपची शून्यातून उभारणी केली. शिवसेनेशी युती करून हा पक्ष सत्ताधारी केला. त्या मुंडे कुटुंबाचे अस्तित्व राजकारणात राहू नये यासाठी दिल्ली आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

पंकजा यांचा विधानसभेला पराभव का आणि कसा झाला हे सांगण्याची गरज नाही. तो त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय आहे. त्याविषयी सर्व जाणून आहेत. गोपीनाथ मुंडे असते तर भाजप-शिवसेना युतीला वेगळी दिशा मिळाली असती. आज जे चित्र आहे ते पहायला मिळाले नसते. पण आज मुंडे नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची राजकारणात अवहेलना केली जात आहे. ते मला स्पष्ट दिसत आहे. अर्थात कुटुंबातील नेत्यांनी हिंमतीने, साहसाने निर्णय घेण्याची गरज असते. परिणाम काय होतील याची पर्वा न करता निर्णय घ्यायचे असतात, तरच तुम्ही राजकारणात टिकू शकता. नाही तर तुम्ही राजकारणातून संन्यास घ्यावा. आमच्यावर अन्याय होतो अशा प्रकारच्या रडगाण्याला कुणीही महत्त्व देत नाही, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा