नवी दिल्ली, 14 मे 2022: दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील तीन मजली व्यावसायिक इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी आग लागली. या अपघातात 27 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी इमारतीचे मालक हरीश गोयल आणि वरुण गोयल यांना ताब्यात घेतले आहे. रात्री एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे.
दुपारी 4.40 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. सुमारे 7 तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, रात्री उशिरा 12 वाजता पुन्हा आगीने रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून खिडक्या तोडल्या आणि इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. दिल्ली पोलिसांनी घटनास्थळापासून संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलपर्यंत ग्रीन कॉरिडॉर बनवला आहे, जेणेकरून जखमींना लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचवता येईल.
इमारतीत अजूनही अडकले आहेत 30-40 लोक
आगीमुळे पेटलेल्या इमारतीत अजूनही 30 ते 40 लोक अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. या इमारतीत अनेक कंपन्यांची कार्यालये होती. येथून सुमारे 150 जणांची सुटका करण्यात आली आहे. 100 लोकांना मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना पीएम रिलीफ फंडातून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे.
सीसीटीव्ही गोदामाला शॉर्ट सर्किटमुळे आग
इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सीसीटीव्ही कारखाना आणि गोदाम आहे. येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले आणि संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी आली. कारखान्यात मोठ्या प्रमाणात कामगार काम करत होते. इमारतीत प्रवेश करणे आणि बाहेर पडणे सारखेच असल्याने बचाव कार्य लवकर सुरू होऊ शकले नाही. अत्यंत गजबजलेल्या जागेमुळे बचाव कार्यात खूप अडचणी येत होत्या.
तळमजला व्यतिरिक्त इमारतीच्या सर्व मजल्यांवरील सर्व वस्तू राख झाली आहे. दिल्लीचे अग्निशमन संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले की, इमारतीमध्ये भरपूर सामान होते. त्यामुळे आग विझवणे कठीण झाले. इमारतीच्या तीनपैकी दोन मजल्यांचा शोध पूर्ण झाला आहे. तिसऱ्या मजल्याचा शोध सुरू आहे.
लोकांनी घाबरून इमारतीवरून उड्या मारल्या
इमारतीच्या खिडक्यांमधून धूर निघत असताना जेसीबी मशीन आणि क्रेनच्या सहाय्याने लोकांना खाली आणण्यात आले, तर काही लोक दोरीच्या साहाय्याने खाली आले. दिल्ली अग्निशमन सेवेचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी सुनील चौधरी यांनी सांगितले की, काही लोकांनी इमारतीवरून उड्या मारल्या, त्यामुळे ते जखमी झाले. अग्निशमन दलाच्या 27 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. रुग्णवाहिकाही तैनात आहे. आजूबाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी पोहोचून लोकांना वाचवण्यात मदत केली.
इमारत मालकाला घेतले ताब्यात
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, मेट्रो स्टेशनच्या पिलर 544 जवळ बांधलेली ही इमारत 3 मजली व्यावसायिक इमारत आहे, जी ऑफिस स्पेस म्हणून कंपन्यांना भाड्याने दिली जाते. या इमारतीची फायर एनओसी नव्हती. पोलिसांनी इमारतीचे मालक हरीश गोयल, वरुण गोयल यांना ताब्यात घेतले आहे.
यामुळं अपघाताने धारण केले मोठे रूप
इमारतीत जागा कमी आणि लोक जास्त काम करत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. अशा परिस्थितीत आग लागल्यावर गोंधळ उडाला, त्यामुळे लोक स्वतःहून सुटू शकले नाहीत आणि अपघाताचे बळी ठरले.येथे सीसीटीव्हीचे गोदाम होते. गोदामातील ज्वाळा आणखी तीव्र झाल्यामुळे अग्निशमन दलाला आग विझवणे कठीण झाले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे