नवी दिल्ली, दि. १६ जून २०२० : दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची तब्येत खालावल्याने त्यांना मंगळवारी दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. सत्येंद्र जैन यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. श्वास घेण्यास त्रास होणे हे कोविड -१९ चे लक्षण मानले जाते त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती वर्तवली जात आहे.
कोविड -१९ ची लक्षणे पाहता सत्येंद्र जैन यांचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. सध्या त्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयांमध्ये सध्या त्यांना ऑक्सिजन सपोर्ट वर ठेवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे सत्येंद्र जैन यांनी स्वतः ही बातमी लोकांसमोर आणली. रुग्णालयात भरती झाल्याचे त्यांनी स्वतःलाच सांगितले. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर सांगितले की, “श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे तसेच ताप आल्यामुळे मला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पुढील घडामोडी मी आपल्याला सातत्याने देत राहील.” यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा ट्विट करत दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केली.
विशेष म्हणजे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन सतत सभांना येत होते. पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतर अधिकाऱ्यांसमवेत अनेक बैठका घेतल्या तेव्हा सत्येंद्र जैन आरोग्यमंत्री म्हणून त्या बैठकीत उपस्थित होते.
यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली होती, अरविंद केजरीवाल यांना ताप येणे यासारखी लक्षणे दिसू लागली होती. चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यामुळे त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी