कुर्डूवाडी (सोलापूर), दि. १६ जुलै २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १८ ते २८ जुलै दरम्यान माढा तालुक्यातील कुर्डूवाडी शहरात लॉकडाऊन करण्याची मागणी नगराध्यक्ष समीर मुलाणी यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संसर्गामुळे रुग्ण संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. १४ जुलैपर्यंत कुर्डूवाडी शहरात एकही रुग्ण आढळून आलेला नव्हता परंतु १५ जुलै रोजी शहरातील साई कॉलनी व देवकते वस्ती या परिसरात दोन रुग्ण आढळून आल्याने ते दोन्ही भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले. पॉझिटिव आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील हायरिस्क व लोरिस्क शहरातील नागरिक असणार आहेत.
शहरात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष समीर मुलाणी यांनी तातडीची बैठक घेऊन दहा दिवसाचा लॉकडाउन करण्याचा विषय हाती घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले.
संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यातील सोलापूर शहर बार्शी मोहोळ अक्कलकोट उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यासह कुर्डूवाडीत दहा दिवसाचा लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा वगळून समावेश करणे आवश्यक आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक आदी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील