परीक्षा घोटाळाप्रकरणी दरेकरांकडून सीबीआय चौकशीची मागणी

मुंबई, 21 डिसेंबर 2021: राज्यात गेल्या काही काळापासून अनेक परीक्षांचे पेपर्स फुटले आहेत. आरोग्य भरती च्या परीक्षेच्या वेळी देखील पेपर फुटी चे प्रकरण समोर आले होते. यावर पुणे पोलीस तपास करत आहे. म्हाडाचा पेपर फोडल्याचं प्रकरण समोर आलं. याचा तपास सुरु असताना आता महा टीईटी परीक्षेतील मोठा गैरप्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेला अटक देखील केली आहे. दरम्यान पोलिसांनी सुपे आणि त्यांच्या मेव्हण्याच्या घरावर छापा देखील टाकला होता. या प्रकरणावर विरोधक सीबीआय मार्फत तपासणी करण्याची मागणी करत आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या प्रकरणाबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणाबाबत दरेकर म्हणाले की, भरती परीक्षांमधील घोटाळा आणि त्यातून कमावलेले कोट्यवधी रुपये आता जनतेसमोर आले आहेत. असं चित्र यापूर्वी महाराष्ट्रात कधी पाहिलं नव्हतं. पण हे सरकार आल्यापासून फक्त आणि फक्त वसुली सुरु असल्याचं अनेकदा स्पष्ट झालं आहे. आता याची गंभीर दखल घेत हे प्रकरण सीबीआयकडे द्यावं आणि याचे धागेदोरे मंत्रालयात कुणाकडे जातात हे शोधून काढायची गरज आहे. तसंच दरेकर यांनी या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

याबरोबरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या सर्व घोटळ्यांची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली आहे. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये फडणवीस म्हणाले आहेत की, “टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेकडे ८८ लाख रुपये सापडल्यानंतर आज आणखी दोन कोटी रुपये रोख आणि सोने सापडले. म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणार्‍या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी दिले. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच तीन महिन्यात बाहेर काढले. ”

तसेच, “आता या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलिस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलीस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत.” असंही फडणवीसांनी म्हटलं आहे

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा