माढा, २६ ऑक्टोबर २०२०: टेंभुर्णी हे माढा तालुक्यातील महत्वाचे व सोलापुर जिल्ह्यातील लोकसंख्येच्या बाबतीत तिसरे मोठे गाव आहे. मोठी बाजार पेठ व शासनाला जास्त प्रमाणात महसूल देणारे गाव असुन, सोलापूर जिल्ह्यातील महामार्ग क्र. 65 वर असलेले महत्वाचे असे टेंभुर्णी या गावाला तालुक्याचा दर्जा देऊन महाराष्ट्रात एक नवीन तालुक्याची निर्मिती करण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचेकडे टेंभुर्णी तालुका निर्मितीची मागणी केली आहे.
टेंभुर्णी हे गांव माढयापेक्षा लोकसंख्येत दोन पटीने जास्त मोठे आहे. टेंभुर्णी गांव सोलापूर जिल्ह्यातील महामार्गावरील अत्यंत महत्वाचे जंक्शन आहे. जिल्ह्यातील मोठ्या बाजारपेठेत टेंभुर्णीची बाजारपेठ गणली जाते. तसेच मशीनरीचे बाबतीत महाराष्ट्रातील मोठे बाजारपेठ पैकी एक आहे. माढा तालुक्यात शासनाला जास्त महसूल देणारे टेंभुर्णी गांव आहे.
टेंभुर्णी येथे मोठी M.I.D.C. आहे. यामध्ये अनेक मोठे-मोठे कारखाने सुरु आहेत. हजारो कामगार येथे काम करतात. टेंभुर्णी हद्दीमध्ये दोन साखर कारखाने देखील आहेत. व्यापाराचे खुप मोठे जाळे येथे पसरलेले आहे. माढा दुय्यम निबंधक कार्यालयात 40 टक्के खरेदी-विक्रीचे व्यवहार हे एकटे टेंभुर्णी गावाचे होतात. लोकसंख्येचे बाबतीत 2011 सालचे जनगणनेनुसार टेंभुर्णी गावाची लोकसंख्या 20 हजारांच्या जवळपास होती, ती लोकसंख्या आज 35 ते 40 हजारांच्या जवळपास गेली आहे. मुंबई, हैद्राबाद महामार्गावर असलेले टेंभुर्णी हे गांव सोलापूर जिल्ह्यातील महत्वाची गाव गणले जाते. टेंभुर्णी तालुका झाल्यास या गावाचे विकासात भर पडेल. नगर पालिका होईल तसेच व्यापार पेठ आता आहे त्यापेक्षा दुप्पटीने वाढेल. गावासाठी शासनाची विकास निधी वाढवून मिळेल. या ठिकाणी टेंभुर्णी तालुका निर्मिती होणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
टेंभुर्णी व जवळपासचे 40 गांव हे टेंभुर्णी बाजाराशी थेट जोडले गेले आहेत. तसेच या 40 गावातील जनतेला दवाखान्यापासून ते बाजारपेठेतील खरेदीसाठी टेंभुर्णी येथे यावे लागते. ही सर्व गावे माढा तालुक्यातील आहेत. तसेच ही सर्व गावे टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे अखत्यारित येतात.
माढा तालुक्यातील टेंभुर्णी जवळचे 40 गावे व माळशिरस, करमाळा व पंढरपुर या तालुक्यातील काही गावे जोडून स्वतंत्र टेंभुर्णी तालुका निर्मिती करावी. टेंभुर्णी तालुका निर्मितीसाठी आवश्यक असणारे तहसील कार्यालय, न्यायालय, दुय्यम निबंधक कार्यालय, भुमिअभिलेख कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व इतर शासकीय कार्यालये करण्यासाठी टेंभुर्णी येथे अनेक शासकीय जागा देखील उपलब्ध आहेत. टेंभुर्णी तालुका निर्मितीसाठीचे मागणीचे शासनाने गंभीरतेने लक्ष देऊन योग्य ते निर्णय घेऊन महाराष्ट्रात एक नवीन तालुका निर्माण करावे व टेंभुर्णीकरांना न्याय द्यावा असे निवेदनाद्वारे लेखी मागणी करण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रदीप पाटील