अहमदपूर शहरातून जाणारा रस्ता ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’कडून विकसित करण्याची मागणी

अहमदपूर (जि. लातूर), २८ नोव्हेंबर २०२२ : अहमदपूर येथील शहरातून जाणारा साधारणतः तीन ते चार किलोमीटर अंतराचा रस्ता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून तातडीने विकसित करावा, अशी आग्रही मागणी माजी नगरसेवक तथा युवा नेते डाॅ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात पूढे म्हटले आहे, की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने नांदेड-लातूर क्रमांक ३६१ हा विकसित करण्यात येत आहे. भविष्यात अवजड वाहतुकीचा त्रास होऊ नये, यासाठी शहराच्या बाहेरून वळण रस्ता (रिंग रोड) मंजूर असून, त्याचे काम प्रगतिपथावर आहे; मात्र यापूर्वीच अहमदपूर शहरातून जाणारा नांदेड-लातूर रस्ता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे वर्ग झाला आहे. याची देखभाल-दुरुस्ती संबंधित कंत्राटदाराकडे आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वहातूक असल्याने सध्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. सातत्याने खड्डे पडणे, प्रचंड धूळ होणे, वाहतुकीची कोंडी यामूळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास होत आहे. यासाठी शहरातील तात्या पेट्रोलपंप ते मरशिवणीपर्यंतचा रस्ता हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे सिमेंट-काँक्रिटीकरण करणे गरजेचे असून यास तातडीने मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी युवा नेते डाॅ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याप्रकरणी तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला मंत्री नितीनजी गडकरी यांनी दिले आहेत.

या शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते तथा माजी कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे, मोहम्मद पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राजमोहम्मद शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा